जनतेची पाण्यासाठी भटकंती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:21 AM2017-10-10T00:21:42+5:302017-10-10T00:21:42+5:30
शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील अनेक वसाहतींमध्ये सोमवारी पाणीपुरवठा विस्कळीत होता. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते, त्यांना पाणीच मिळाले नाही. मागील पाच ते सहा दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना खाजगी टँकरचा आधार घ्यावा लागला. पिण्यासाठीही अनेक घरांमध्ये पाणी नसल्याने २० ते ३० रुपये खर्च करून पाण्याचे जार आणावे लागले. पाणी कधी येईल, याची माहिती मनपा अधिकारी व कर्मचा-यांकडून देण्यात येत नव्हती. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना पाण्यासाठी भंडावून सोडले होते.
नंदनवन कॉलनी, संगीता कॉलनी, पुंडलिकनगर, सिडको एन-२, बेगमपुरा परिसर, हनुमान टेकडी, विद्युत कॉलनी, स्वामी विवेकानंदनगर हडको, म्हाडा कॉलनी, मूर्तिजापूर, जाधववाडी, बुढीलेन, लोटाकारंजा, शहागंज आदी कितीतरी वसाहतींमध्ये सोमवारी पाणी आले नाही. मागील चार ते पाच दिवसांपासून पाणी न आल्याने नागरिकांना सोमवारी कामकाजाच्या दिवशी पाण्यासाठी भटकंती करावी लागली. अनेक मोठ्या सोसायट्या आणि बंगल्यांमध्ये खाजगी पाण्याचे टँकर पाणी देत असल्याचे दिसून आले. जाधववाडी भागात तर पावसाचे पाणी छतावरून खाली कोसळत असताना नागरिकांनी ड्रम लावून भरून घेतले. धुणी, भांडी आदी वापरासाठी पाणी कामाला येईल, असेही काही नागरिकांनी सांगितले.
दूषित पाण्याच्या तक्रारी
रामनगर, सिंहगड कॉलनी आदी वसाहतींमध्ये दूषित पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. सोमवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात आले त्यांच्या पाण्यात क्लोरिनचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होते. पाण्यात क्लोरिनचा प्रचंड वास येत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.
पर्यायी व्यवस्थाच नाही
महापालिकेने खाजगी कंत्राटदाराच्या माध्यमाने टँकरची व्यवस्था मजबूत केली आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून ज्या वसाहतींना पाणी मिळाले नाही, त्यांना टँकरद्वारेही पाणी देण्याची तसदी मनपा प्रशासनाने घेतली नाही.
तक्रारींचा महापूर
महापौर बापू घडमोडे यांनी सांगितले की, शहरात पाणी आले नाही, म्हणून प्रचंड तक्रारी आहेत. असंख्य नागरिक पाणी आले नाही, तरीही सहन करीत आहेत. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर येऊन संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला. प्रशासनाने युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करायला हवा.