डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

By प्रशांत तेलवाडकर | Published: November 17, 2022 03:44 PM2022-11-17T15:44:40+5:302022-11-17T16:04:50+5:30

डिजिटल बँकिंगने करून दाखविले, यूपीआयमुळे एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत.

Citizens walk around with banks in their pockets; Now ATMs are also empty | डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

डिजिटल क्रांती! खिशातच बँक घेऊन फिरतात नागरिक; आता एटीएमही पडताहेत ओस

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद :
तुम्ही स्वत:लाच विचारा की, आपण मागील किती महिन्यांपासून एटीएममध्ये जाऊन रोख रक्कम काढली? काही जण म्हणतील महिनाभरापूर्वी, काही म्हणतील सहा महिने, तर काही जण सांगतील वर्षभरापासून मी एटीएममध्ये गेलोच नाही. पूर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएमवर जावे लागत असे. मात्र, आता बँकच प्रत्येकाच्या खिशात सामावली आहे. मागील वर्षभरात शहरात डिजिटल व्यवहार ५० टक्क्यांनी वाढले. याचा परिणाम, आधीच बँकेच्या कॅश काऊंटरवर झाला होता, आता एटीएमवरही होणे सुरू झाले आहे. ३० टक्क्यांनी एटीएमवरील व्यवहार कमी झाल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले आहे.

एटीएमच्या गर्दीवर परिणाम
महाराष्ट्र बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने सांगितले की, यूपीआयमुळे त्यांच्या एटीएमवरील ट्रान्झॅक्शन ३० टक्क्यांनी कमी झाले आहेत. पूर्वी एटीएमवर गर्दी दिसत होती, आता ती दिसत नाही. दिवाळीतही कोणत्याच एटीएमवर रोख काढण्यासाठी मोठ्या रांगा दिसल्या नाही.

पगार खिशात नव्हे मोबाइलमध्येच
वर्षभरापूर्वी कर्मचारी पगार झाल्यावर ते एटीएममधून काढून घरी आणत. मात्र, आता अनेक जण महिनोन महिने एटीएममध्ये जातच नाहीत. चिल्लर व्यवहारही यूपीआयद्वारे केले जात आहे. यामुळे पगार आता मोबाइलमध्येच राहत आहे.

एटीएम कार्ड विसरण्याचे प्रमाण वाढले
बँक व्यवस्थापकाने सांगितले, एटीएममध्येच कार्ड विसरून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. एका एटीएमवर मागील वर्षभरात ४३ एटीएम कार्ड सापडले. ते घेण्यासाठी लोक पुन्हा येत नाही. ते बँकेत फोन करतात व कार्ड ब्लॉक करून टाकतात. नवीन एटीएम कार्ड घेतात.

सर्वाधिक एटीएम एसबीआयचेच
जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे मिळून ३१७ एटीएम आहेत. त्यापैकी एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे २२७ एटीएम आहेत. १६ खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक १२५ एटीएम आहेत.

व्यवहारात वाढला ‘यूपीआय’ वापर
देशात सध्या दररोज ११ लाख कोटींचे व्यवहार यूपीआयमार्फत होत आहेत. त्यासाठी ६७८ कोटी ट्रान्झॅक्शन केले जात आहे. मे महिन्यातील आकडेवारी १० लाख कोटी होती.

कॅश काऊंटरवर ५० टक्के परिणाम
एटीएम आल्यापासून बँकेतील कॅश काऊंटरवर २० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला होता. आता यूपीआयमुळे कॅश काऊंटरवरील रोख रकमेचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.
- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयइए

अजून नाही परिणाम
एसबीआयच्या टाऊन सेंटर येथील एटीएमवर अजून युपीआयचा तेवढा परिणाम झाला नाही. आम्हाला दिवसातून दोन वेळेस एटीएममध्ये रक्कम भरावी लागते.
- इम्तियाज परवेज, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय टाऊन सेंटर शाखा

डिजिटल व्यवहाराकडे वाढता कल
डिजिटल व्यवहाराकडे नागरिकांचा कल वाढत आहे. कोणी जवळ पैसा बाळगण्यास तयार नाही. पैशाची जागा मोबाइलने घेतली आहे. त्याद्वारे खिशातच बँक घेऊन नागरिक फिरत आहे. डिजिटल क्रांती घडत आहे.
- मंगेश केदार, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

पेट्रोल पंपावर ५० टक्के व्यवहार डिजिटल
मागील दोन वर्षात यूपीआयमुळे रोख व्यवहारावर मोठा परिणाम झाला आहे. आमच्या पेट्रोल पंपावर दररोज होणारे व्यवहारापैकी ५० टक्के व्यवहार डिजिटल होत आहे. तर उर्वरित ५० टक्के व्यवहार रोख स्वरूपात होत आहे.
- अखिल अब्बास, पेट्रोल पंप मालक

जिल्ह्यात ५६६ एटीएम
बँक             --- एटीएम

पब्लिक सेक्टर बँक -- ३१७
प्रायव्हेट बँक---२३९
स्मॉल फायनान्स बँक--०७
महाराष्ट्र ग्रामीण बँक --- ०१
जिल्हा मध्यवर्ती बँक-- ०२
(जिल्हा अग्रणी बँकेकडून प्राप्त आकडेवारी)

Web Title: Citizens walk around with banks in their pockets; Now ATMs are also empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.