शहर पुन्हा गारठले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 11:21 PM2019-02-09T23:21:51+5:302019-02-09T23:22:34+5:30

शहरामध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून, चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी सकाळी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाचा हा चौकार ठरला आहे. शहरात थंडीच्या गारठ्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.

The city is again frozen | शहर पुन्हा गारठले

शहर पुन्हा गारठले

googlenewsNext
ठळक मुद्देतापमान ६.५ अंशाखाली : यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाचा चौकार


औरंगाबाद : शहरामध्ये थंडीचा कडाका पुन्हा एकदा वाढला असून, चिकलठाणा वेधशाळेत शनिवारी सकाळी किमान तापमान ६.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविल्या गेले. यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाचा हा चौकार ठरला आहे. शहरात थंडीच्या गारठ्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे.
शहरात डिसेंबरअखेर ५.८ अंश सेल्सिअस इतक्या रेकॉर्ड ब्रेक थंडीची नोंद झाली होती. या किमान तापमानाच्या नोंदीनंतर गायब झालेल्या थंडीने २७ ते ३० जानेवारीदरम्यान पुनरागमन केले. या कालावधीत तापमानात मोठी घसरण झाल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होत गेली. चिकलठाणा वेधशाळेत ६ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३१.६ तर किमान तापमान १५.४ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. त्यामुळे थंडी संपली आणि उन्हाचा चटका वाढणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच शुक्रवारी अचानक तापमानात घट झाली. किमान तापमान १० अंशापर्यंत घसरले. त्यात शनिवारी आणखी घट झाली आणि कमाल तापमान २६ तर किमान तापमान ६.५ इतकी नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील हे चौथ्या क्रमांकाचे नीचांकी तापमान असल्याची माहिती चिकलठाणा वेधशाळेतर्फे देण्यात आली.
अवघ्या दोन दिवसांत थंडीत प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना चांगलीच हुडहुडी भरत आहे. उत्तरेकडील वाऱ्यामुळे दिवसाही कमालीचा गारठा जाणवत आहे. त्यामुळे ऊबदार कपड्यांशिवाय घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. ग्रामीण भागांबरोबर शहरातही ठिकठिकाणी पुन्हा शेकोट्या पेटल्या आहेत. रिक्षाचालक, सुरक्षारक्षक आणि नागरिक रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून बसलेले चित्र पाहायला मिळत आहे.
आणखी काही दिवस थंडी
एमजीएम खगोलशास्त्र विभागाचे संचालक श्रीनिवास औंधक र म्हणाले, ध्रुवीय वारे परत दाखल झाले आहे. त्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. उत्तर भारतातील हवामानामुळेही किमान तापमानात घट झाली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहणार आहे.
यंदाचीे सर्वात कमी तापमानाची नोंद
तारीख किमान तापमान
२९ डिसेंबर २०१८ - ५.८
३० डिसेंबर २०१८ - ६.८
३१ डिसेंबर २०१८ - ७.०
९ फेब्रुवारी २०१९ - ६.५
-----------------------------------

 

Web Title: The city is again frozen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.