शहरात दुसऱ्या दिवशीही गुन्हे शाखेकडून शस्त्रे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 06:10 PM2018-05-31T18:10:50+5:302018-05-31T18:11:42+5:30
खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला.
औरंगाबाद : खेळणीच्या नावाखाली घातक शस्त्रे मागविण्यात येत असल्याचे सोमवारी मध्यरात्रीनंतर उघडकीस आले. शहरातील विविध भागांत पोलिसांनी कारवाई करून शस्त्रसाठा जप्त केला. या घटनेला १४ तास उलटत नाहीत तोच दुसऱ्या दिवशीही शस्त्रसाठा आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. शहरातील इन्स्टाकार्ट सर्व्हिसच्या कार्यालयावर पाळत ठेवून गुन्हे शाखेने हा शस्त्रसाठा जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
जयभवानीनगर, नागेश्वरवाडीत मंगळवारी शस्त्रास्त्र साठाप्रकरणी डिलिव्हरी हब, आॅफिसचे इंचार्ज, तसेच शस्त्रे मागविणाऱ्यांना अटक करून मुकुंदवाडी व क्रांतीचौक पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. मंगळवारच्या पोलीस कारवाईनंतरही नागेश्वरवाडीतील इन्स्टाकार्टच्या कार्यालयात कुरिअरने शस्त्रास्त्रे दाखल झाली. याची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व सहकारी कुरिअरच्या कार्यालयात धडकले. पार्सलची तपासणी केली असता पुन्हा धारदार शस्त्रे आढळून आली.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, फौजदार नंदकुमार भंडारी, साईनाथ महाडिक, पोहेकॉ सुभाष शेवाळे, संजय धुमाळ, पोलीस नाईक सतीश हंबरडे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, अफसर शहा, पोकॉ सय्यद अशरफ, सिद्धार्थ थोरात, योगेश गुप्ता, नंदलाल चव्हाण, ओमप्रकाश बनकर, राहुल हिवराळे, नितीन धुळे, राजेंद्र चौधरी, मच्छिंद्र सोनवणे, रत्नाकर म्हस्के, कांबळे, शिवा बोर्डे यांनी कार्यालयाचा ताबा घेत पार्सलची तपासणी केली. त्यावेळी ५ तलवारी, १ जंबिया, १ दोनपाती धारदार चाकू, अशी ७ शस्त्रास्त्रे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
शस्त्रसाठा कशासाठी
शहरात नुकतीच दंगल झाली असून, त्या पार्श्वभूमीवर शस्त्रसाठा पकडणे म्हणजे ही धोक्याची घंटा समजली जात आहे. कुरिअरच्या माध्यमातून खेळणीच्या नावाखाली शस्त्रे राजरोसपणे शहरात येत आहेत. ती कशासाठी वापरली जाणार होती, याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दोन पथके रवाना
भिवंडी येथून शस्त्राचा साठा कुरिअरमार्फत शहरात ज्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे, अशा ग्राहकांच्या घरी येत होता. खुलेआम प्राणघातक शस्त्र खेळणीच्या नावाखाली शहरात पाठविणाऱ्या बंगळुरु व भिवंडी येथील संचालकांच्या शोधात पोलीस पथक रवाना करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त रामेश्वर थोरात यांनी सांगितले.
पार्सलवर नावे अपूर्ण
पोलिसांना जे पार्सल आढळून आले त्यावर सिंगल नावे आहेत, त्यामुळे पोलीस पत्ता शोधण्यासाठी कुरिअरच्या पावतीवर टाकलेला मोबाईल नंबर व स्थानिक पत्यावरून आरोपीचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेची सात पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत.
- डॉ.दीपाली धाटे-घाडगे
शहरातील कुरिअर सेवेची तपासणी
शहरात किती आॅनलाईन डिलिव्हरीची कार्यालये आहेत. त्यांनी आतापर्यंत पोहोच केलेली घातक शस्त्रे कोणकोणत्या भागात पाठविली आहेत, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. कुरिअर चालकांचे आवक-जावक रेकॉर्ड तपासल्याशिवाय शस्त्रसाठा किती ठिकाणी पोहोचला, हे सध्या सांगणे योग्य नाही. आम्ही चौकशी करीत आहोत.
- चिरंजीव प्रसाद, पोलीस आयुक्त, औरंगाबाद