नवरात्रोत्सवात शहर बनले गटारगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:04 AM2017-09-27T01:04:42+5:302017-09-27T01:04:42+5:30
मोठे सण डोळ्यासमोर असताना शहरातील १४ लाख नागरिकांना त्रासच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ११४ वॉर्डांमध्ये ५०० पेक्षा अधिक ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप झाल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. लवकरच दसरा आणि सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. अनेक मोठे सण डोळ्यासमोर असताना शहरातील १४ लाख नागरिकांना त्रासच त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील ११४ वॉर्डांमध्ये ५०० पेक्षा अधिक ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप झाल्या आहेत. दूषित, दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्याने वाहत आहे. जिकडे तिकडे हे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवात शहरातील हजारो भाविक चप्पलचा वापर करीत नाहीत, त्यांना दुर्गंधीतूनच ये-जा करावी लागत आहे.
शहरातील ड्रेनेज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी हवी तेवढी यंत्रसामुग्री, कर्मचारी नाहीत. अत्यंत तोकड्या कर्मचाºयांवर ड्रेनेज व्यवस्थेचा डोलारा सांभाळावा लागत आहे. प्रत्येक वॉर्ड कार्यालयातील कर्मचारी किमान दोन ते तीन तक्रारींची शहानिशा करतात. प्रत्येक नगरसेवकाच्या वॉर्डात किमान चार ते पाच ठिकाणी ड्रेनेजलाइन चोकअप आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवरही ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी तर दोन ते तीन महिने झाले तरी महापालिकेचे कर्मचारी दुरुस्तीसाठी येत नाहीत. शहरातील ४० टक्के नागरिक रांगा लावून महापालिकेच्या वॉर्ड कार्यालयांमध्ये मालमत्ता कर भरतात. त्यांनाही नादुरुस्त ड्रेनेज यंत्रणेचा त्रास सहन करावा लागतो. मालमत्ता करात ड्रेनेज करासह भूमिगत गटार योजनेचा सिव्हेज कर नागरिकांकडून वसूल करण्यात येत आहे. दरवर्षी ड्रेनेज आणि सिव्हेज कराच्या माध्यमातून मनपाकडे जेवढी रक्कम जमा होते, तेवढी रक्कमही मनपा दुरुस्तीवर खर्च करीत नाही. शहरातील अनेक वसाहतींमध्ये लोकसंख्येच्या अनुषंगाने ड्रेनेजलाइन टाकल्या होत्या. अनेक वसाहतींमध्ये लोकसंख्या वाढली पण ड्रेनेजलाइन जुन्याच आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाइन चोकअप होत आहेत.