सिटी बसचा ३ तास ‘चक्का जाम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:06+5:302021-01-25T04:06:06+5:30
औरंगाबाद : सिडको बसस्थानकात सिटी बस घेऊन येणाऱ्या चालकाला रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ...
औरंगाबाद : सिडको बसस्थानकात सिटी बस घेऊन येणाऱ्या चालकाला रिक्षाचालकांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सिटी बसच्या चालक-वाहकांनी बसेस घेऊन जाण्यास नकार दिला. तब्बल तीन तास सिटी बसचा चक्का जाम झाला.
समाधान वानखेडे असे मारहाण झालेल्या सिटी बसचालकाचे नाव आहे. रांजणगाव येथे कर्तव्यावर जाण्यासाठी मुकुंदवाडी आगारातून सिटी बस घेऊन ते सिडको बसस्थानकात दाखल होत होते; परंतु बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर एक रिक्षा उभी होती. त्यामुळे त्यांनी रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले; परंतु रिक्षाचालक मोबाईलवर बोलत उभा होता. त्यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यात रिक्षाचालक आणि अन्य तिघांनी समाधान वानखेडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून एस.टी. महामंडळाचे चालक तात्यावर मुंढे यांनी मदतीसाठी धाव घेतली; परंतु त्यांनाही मारहाण करण्यात आली. अन्य कर्मचारी धावून आल्यानंतर तिघांनी पळ काढला; परंतु एस. टी. कर्मचाऱ्यांनी एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकारानंतर सिटी बसच्या चालक-वाहकांनी कर्तव्यावर जाणार नसल्याचा पवित्रा घेतला. प्रवेशद्वारावर एकत्र येत रोष व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वाहतूक अधिकारी अमोल अहिरे यांनी बसस्थानकात धाव घेऊन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. बसस्थानकाच्या आतमध्ये रिक्षाचालक येता कामा नये; परंतु सुरक्षारक्षक केवळ बघ्याची भूमिका घेतात. प्रवेशद्वारासमोरच रिक्षा उभा केल्या जातात. त्यातून रोज वाद होतात. बसस्थानकासमोरील रिक्षा थांबा हटवा, रिक्षाचालकांना आतमध्ये येण्यापासून रोखा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
पोलीस आयुक्तांना भेटणार
शहरातील प्रत्येक बसथांब्यावर रिक्षा उभ्या राहतात, याकडेही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले. याप्रश्नी पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाईल, असे अमोल अहिरे यांनी सांगितले. या आश्वासनानंतर सकाळी १० वाजता सिटी बसची सेवा सुरळीत झाली. तोपर्यंत अनेक प्रवाशांना सिटी बसच्या प्रतीक्षेत ताटकळावे लागले.
फोटो ओळ...
मारहाण झालेले चालक समाधान वानखेडे.
चालक-वाहकांनी अशा प्रकारे एकत्र येत संताप व्यक्त केला.
सिडको बसस्थानकात उभ्या सिटी बसेस.