शहर बससेवाही सुरू झाली; पहिल्या टप्प्यात प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 03:27 PM2021-06-08T15:27:08+5:302021-06-08T15:31:32+5:30
फेब्रुवारी, २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे १० मार्चनंतर सिटी बस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा बससेवा बंद केली.
औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बंद करण्यात आलेली स्मार्ट सिटीची शहर बससेवा मंगळवारपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती सोमवारी महापालिका प्रशासनाने दिली. प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेसच्या माध्यमातून २४२ फेऱ्या केल्या जाणार आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यासंदर्भात ‘लोकमत’ने सोमवारी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मंगळवारपासून शहर बस सुरू करण्याचे आदेश दिले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर ५ नोव्हेंबर, २०२० रोजी पहिल्या टप्प्यात ३० बसेस सुरू करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी, २०२१च्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली. त्यामुळे १० मार्चनंतर सिटी बस व्यवस्थापनाने पुन्हा एकदा बससेवा बंद केली. आता ८७ दिवसांनी अनलॉक जाहीर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात मंगळवारपासून प्रमुख पाच मार्गांवर १६ बसेस सुरू केल्या जाणार आहेत. प्रवाशांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून, बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन स्मार्ट शहर बस विभागाने केले आहे. सर्व बसेस निर्जंतुक केलेल्या राहतील, तर प्रवासाच्या वेळी मास्क, सॅनिटायझर वापरणे व शासकीय आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे प्रवाशांना बंधनकारक आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून दुसऱ्या टप्प्यातील बसेस सुरू केल्या जातील, असे प्रशासनाने म्हटले आहे.
या पाच मार्गांवर धावणार शहर बस
- मार्ग क्र. ४ : सिडको ते रेल्वे स्टेशनमार्गे टीव्ही सेंटर
- मार्ग क्र. ५ : औरंगपुरा ते रांजणगावमार्गे मध्यवर्ती बस स्थानक
- मार्ग क्र. १० : औरंगपुरा ते छत्रपती शिवाजी नगरमार्गे महावीर चौक, सेव्हन हिल
- मार्ग क्र. १२ : सिडको ते घाणेगावमार्गे रांजणगाव, मायलन
- मार्ग क्र. १३ : सिडको ते जोगेश्वरीमार्गे रांजणगाव.