पीपीपी मॉडेलवर शहर बससेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2016 01:17 AM2016-10-02T01:17:03+5:302016-10-02T01:22:11+5:30
औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी मॅडेलवर शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.
औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत पीपीपी मॅडेलवर शहर बससेवा सुरू करण्याचा निर्णय शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. औरंगाबादकरांना स्मार्ट सिटीचे फायदे कसे दिसून येतील अशा कामांना प्राधान्य देण्यात येईल. स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसपीव्हीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
केंद्र शासनाने मागील महिन्यातच औरंगाबाद शहराची स्मार्ट सिटीसाठी निवड केली आहे. यानंतर एसपीव्हीची स्थापना करण्यात आली. एसपीव्हीचे मेन्टॉर तथा संचालक अपूर्व चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. ऐनवेळी अपूर्व चंद्र बैठकीस हजर राहू शकले नाहीत. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, महापौर त्र्यंबक तुपे, उपमहापौर प्रमोद राठोड, सभापती मोहन मेघावाले, विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार, काँग्रेसचे गटनेते भाऊसाहेब जगताप, फोट्रेस कंपनीचे अजय भोरे आदींची उपस्थिती होती.
एसपीव्हीच्या बैठकीत विविध विकासकामांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. पॅन सिटीमध्ये जुन्या शहराला जास्तीत जास्त फायदा मिळेल अशा दोनच गोष्टी आहेत. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि घनकचरा या दोनच मुद्यांचा समावेश आहे. शहरात पीपीपी मॉडेलवर एसपीव्हीअंतर्गत बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. त्यावर शिक्कामोर्तबही करण्यात आला. सेफ सिटीअंतर्गत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही, शहरातील प्रत्येक चौकांचे सुशोभीकरण करावे, प्रत्येक चौकात झेब्रा क्रॉसिंग असावे, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. एसपीव्हीचे संचालक अपूर्व चंद्र यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरही बोलू शकले नाहीत.
\अत्याधुनिक बससेवा
शहराला सार्वजनिक बसेसची खूप गरज आहे. मोठ्या अंतरासाठी मोठ्या बसेस ठेवण्याचा विचार आहे. जुन्या शहरासाठी चांगल्या आकर्षक अशा लहान बसेस ठेवण्यात येतील. बसस्टॉप अत्यंत आधुनिक असतील. पर्यटकांसाठी औरंगाबाद दर्शन या स्वतंत्र बसचाही समावेश असेल.