शहरात महिनाभरात शिजते ५०० क्विंटल खिचडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:33 AM2017-11-06T00:33:20+5:302017-11-06T00:33:25+5:30
रेस्टॉरंट ते पंचतारांकित हॉटेलमध्येही डाळ खिचडीचा तडका खवय्यांना तृप्त करीत असतो. म्हणूनच तर शहरात दर महिन्याला ५०० क्विंटल खिचडी शिजते.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एरव्ही दररोजच्या जेवणात असणारी खिचडी आता ‘ग्लोबल ब्रॅण्ड’ म्हणून ओळखली जाणार आहे. पर्यटनाच्या राजधानीत घराघरांतच नव्हे, तर रेस्टॉरंट ते पंचतारांकित हॉटेलमध्येही डाळ खिचडीचा तडका खवय्यांना तृप्त करीत असतो. म्हणूनच तर शहरात दर महिन्याला ५०० क्विंटल खिचडी शिजते.
घरातील लहानांपासून थोरांपर्यंत ‘खिचडी’ ही लोकप्रिय पाककृती होय. देशात असा कोणताच भाग नाही की, तेथील लोक खिचडी खात नाहीत. म्हणून तर ‘खिचडी’ला भारताच्या विविधतेतील एकतेचे प्रतीक मानले जाते. देशात भात खाणाºयांची संख्या कमी नाही त्याचप्रमाणे ‘डाळ- खिचडी’चा आस्वाद घेणाºयांची संख्याही काही कमी नाही. रेस्टॉरंटमध्ये थाली प्रकारात ‘डाळ-खिचडी व सोबतीला आंबटगोड कढी’ असा बेत असतोच. एवढेच काय शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्येही विदेशी पर्यटकही आवर्जून भारतीय ‘डाळ-खिचडी’ खाण्यास प्राधान्य देतात.
रेस्टॉरंटचे मालक अशोक शहा यांनी सांगितले की, थाळी प्रकारात ‘डाळ-खिचडी’ने कायमचे स्थान मिळविले आहे. डाळ-खिचडी व त्यावर कढी खाल्ल्याशिवाय खवय्यांचे जेवण पूर्ण होतच नाही. केटरर्स किशोर लव्हेकर यांनी सांगितले की, लग्नसोहळेवगळता वाढदिवस, धार्मिक कार्यक्रमांत मूग-खिचडी, डाळ-खिचडी, साधी खिचडी, असे अनेक प्रकार आवर्जून केले जातात. कारण, खिचडी करण्यास जास्त वेळ लागत नाही व ती बनवणे सहजसोपे असते. हजारो लोकांना पुरेल एवढी खिचडी एकाच वेळी तयार करता येते. हॉटेल रामा इंटरनॅशनलचे शेफ दिनकर सरदेसाई म्हणाले की, पचण्यास हलका पदार्थ असल्याने विदेशी पर्यटकही खिचडी खाण्यास प्राधान्य देत असतात. त्यास मसालेदार खिचडी, गावरान तूप व जिरा तडका मारलेली खिचडीही आवर्जून खाल्ली जाते. तसेच कॉपोरेट क्षेत्रातील ग्राहकही घरगुती अन्नपदार्थ म्हणून खिचडीची मागणी करीत असतात.
तांदळाचे होलसेल विक्रेते जगदीश भंडारी यांनी सांगितले की, खास खिचडीसाठी बासमती तुकडा, गुजरात बासमती व नाशिक येथील इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी असते. दर महिन्याला शहरात फक्त खिचडीसाठी ५०० क्विंटल तांदूळ विकला जातो. यात सुमारे २ कोटींची उलाढाल होते.
नीलेश सोमानी या व्यापा-याने सांगितले की, कालीमुछ तुकडा, अंबेमोहर तुकडा (चुरी) तांदळापासूनही खिचडी केली जाते.