सिटी गेस्ट : तिसरी लाट आली तरी सौम्य स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:02 AM2021-07-27T04:02:26+5:302021-07-27T04:02:26+5:30
दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. तिसऱ्या लाटेत कोरोनाची अशी मजबूत स्थिती राहणार नाही. बालकांना फारसा धोका राहणार ...
दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबाला कोरोनाने विळखा घातला. तिसऱ्या लाटेत कोरोनाची अशी मजबूत स्थिती राहणार नाही. बालकांना फारसा धोका राहणार नाही. मात्र, तिसरी लाट येणारच नाही, हे म्हणणे चुकीचे आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियम मोडले तरच तिसरी लाटही विक्राळ रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमांचे पालन आणि लसीकरणावर अधिक भर हवा.
---
जगभरात अनेक देशांत कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही त्यादृष्टीने तयारी ठेवावी लागेल. सध्या रोज कमी-अधिक प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत. पहिल्या लाटेचा शिखर उंच होता, तर दुसऱ्या लाटेचा शिखर मजबूत होता. दुसऱ्या लाटेत अनेकांचा बळी गेला; पण तिसरी लाट छोट्या-छोट्या स्वरूपात राहील, असे वाटते. शाळा बंद असल्याने लहान मुले एकत्र येत नाहीत. गेल्या महिनाभरात कोरोनाची लागण होणाऱ्या बालकांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात राहील.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे ‘चल जाएगा’ असे म्हणून चालणार नाही. अन्यथा गंभीर स्थिती होऊ शकते. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जात आहे; पण लसींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. शिवाय वातावरणातील बदल हे संसर्गवाढीला हातभार लावतात. नियमांच्या पालनासह या दोन गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे.
कोरोना नियंत्रणासाठी खाजगी रुग्णालयांनी १०० टक्के सहकार्य दिले आहे. रुग्ण, शासन आणि रुग्णालयांत सुसंवादाची गरज आहे. प्रादुर्भावात सोयीसुविधा वाढविण्यास सांगितले जाते. मात्र, त्या सुविधा नंतर वापरता येत नाहीत. त्यामुळे अशावेळी शासनाने सोयीसुविधा वाढीसाठी रुग्णालयांना मदत केली पाहिजे. कोणत्याही परिस्थीला, आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मराठवाड्यातील रुग्णालये सक्षम आहेत.