शहरासाठी गतीने कामे केली
By Admin | Published: September 15, 2014 12:39 AM2014-09-15T00:39:05+5:302014-09-15T00:41:24+5:30
औरंगाबाद : औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराच्या विकासासाठी मला गतीने बरीचशी कामे करता आली.
औरंगाबाद : औरंगाबादसारख्या ऐतिहासिक व पर्यटनाची राजधानी असलेल्या शहराच्या विकासासाठी मला गतीने बरीचशी कामे करता आली. बरेचसे काही करावयाचे राहूनही गेले. त्या योजना व कल्पना मला नागपुरात नक्कीच उपयोगी पडणार आहेत, असे उद्गार आज येथे औरंगाबाद मनपाचे मावळते आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांनी काढले.
आपल्या वीस महिन्यांच्या कारकीर्दीत डॉ. कांबळे यांनी बाराशे कोटींच्या कामांची सुरुवात केली. समांतर जलवाहिनी, भूमिगत गटार योजना, एलईडी व मनपा शाळांच्या निकालात ८० टक्के वाढ, अशा काही ठळक बाबींचा उल्लेख करता येईल व यासाठी औरंगाबादकर नेहमीच त्यांना आठवणीत ठेवतील.
संत एकनाथ रंगमंदिरात सायंकाळी त्यांचा नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. मानपत्र, शाल व पुष्पहार देऊन माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या हस्ते हा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी संत एकनाथ रंगमंदिर तुडुंब भरले होते. शिवाय अनेक संस्था- संघटना व व्यक्तींनी आवर्जून उपस्थित राहून डॉ. हर्षदीप कांबळे यांचा सत्कार केला.
यावेळी डॉ. कांबळे यांच्या आई जोहर व वडील श्रीराम कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.