शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ३.८६, रिकव्हरी रेट ९६.२८
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:03 AM2021-05-26T04:03:56+5:302021-05-26T04:03:56+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी ...
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट ३४ वरून आता थेट ३.८६पर्यंत तर रिकव्हरी रेट ९६.२८ टक्के एवढा मंगळवारी नोंदविण्यात आला. १ जूनपासून राज्य शासन निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पॉझिटिव्हिटी आणि रिकव्हरी रेटचे आकडे यासाठी सहायक ठरतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संक्रमण निश्चित कमी झाले असले तरी धोका अद्याप टळलेला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
लसीकरण, लॉकडाऊन आदी कारणांमुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने कमी होत आहे. दोन महिन्यांपूर्वी शहरात १०० नागरिकांची तपासणी केली, तर त्यातील ३४ जण पॉझिटिव्ह येत होते. संक्रमणाचे हे आकडे आरोग्य आणि शासकीय यंत्रणेला थक्क करणारे होते. आता शंभर नागरिकांची तपासणी केली तर फक्त चारजण बाधित आढळून येत आहेत. बाधित आढळून आलेल्यांमध्ये बरे होण्याचे प्रमाण तब्बल ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक नुकसान म्हणजे जीवितहानीचे झालेले आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले मृत्युसत्र थांबत नसल्याचे चित्र आहे. शहरात दररोज किमान दहा, तर जिल्ह्यात १७ ते २४ रुग्णांचा मृत्यू होत आहे. विशेष बाब म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसह आता ३० ते ३५ वयोगटांतील तरुणही मृत्युमुखी पडत आहेत. मागील महिन्यात कोरोना संशयित म्हणून मरण पावलेल्या रुग्णांची संख्या तब्बल १७०० होती. सध्याही कोरोना आणि संशयितांचा आकडा प्रचंड वाढलेला आहे. मात्र शासकीय यंत्रणेचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.