शहरात मोहर्रमची अनोखी परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:07 PM2018-09-19T19:07:52+5:302018-09-19T19:09:39+5:30
उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम म्हटले की, सुन्नी मुस्लिम बांधवांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरत असे.
औरंगाबाद : उर्दू कॅलेंडरनुसार मोहर्रम म्हटले की, सुन्नी मुस्लिम बांधवांसाठी एक प्रकारे पर्वणीच ठरत असे. मोहर्रमच्या दहा दिवसांमध्ये रोट, चोंगे, सरबतची मेजवानी असायची. हळूहळू काळ बदलू लागला. प्रत्येक घरातील मोहर्रमची लगबगही थंडावली. ७०० वर्षांपूर्वी ज्या पद्धतीने सवाऱ्या बसविण्यात येत होत्या, तशाच सवाऱ्या आजही बसविण्यात येतात. यात फरक पडला फक्त संख्येचा. पूर्वी शहरात ३८६ सवाऱ्या बसत होत्या. आज त्यांची संख्या १११ वर आली आहे. सवाऱ्यांना मानणारा वर्ग कमी-कमी होऊ लागला आहे.
तैमुरलंग भारतावर आक्रमण करण्यासाठी इराणमधून आला तेव्हापासून सवाऱ्या बसविण्याची प्रथा आहे. मोगल कालखंडातही सवाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व होते. जगभरात इस्लामचा प्रचार आणि प्रसार फारसा झालेला नव्हता. मागील काही वर्षांमध्ये तबलीग जमातने केलेल्या जनजागृतीमुळे सवाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. औरंगाबाद शहरातही मोहर्रम ४०० वर्षांपासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. माजी महापौर तथा अलम बरदार कमिटीचे अध्यक्ष रशीद मामू यांनी सांगितले की, जगभरात कुठेच शिया आणि सुन्नी मुस्लिम मोहर्रमच्या १० तारखेला एकत्र येत नाहीत.
औरंगाबाद शहर याला एकमेव अपवाद आहे. दोन्ही समाज एकमेकांचा आदर करीत आपले व्यासपीठ उपलब्ध करून देतात. शिया बांधव मातम म्हणजेच इमाम हुसैन यांच्या आठवणीत दु:ख व्यक्त करतात. सुन्नी मुस्लिम सवाऱ्यांच्या माध्यमाने आनंद व्यक्त करतात. दोन्ही समाजांना एकात्मतेच्या दोरीत बांधून ठेवण्याचे काम अलम बरदार कमिटीने केले. मागील ४१ वर्षांमध्ये दोन समाजांत विविध समाजाचे सण एकत्रित आले तरीही समाजामध्ये किंचितही वाद झाला नाही, असे रशीदमामू म्हणाले.
ताजिया पद्धत लुप्त
मोहर्रमच्या ७ तारखेला सातारा, देवळाई, हर्सूल, सावंगी आदी भागांतून ताजिया शहरात येत असत. हळूहळू ही पद्धत बंद झाली. मोहर्रमला बुढीलेन, लोटाकारंजा, चेलीपुरा आदी भागांत मजमा भरविण्यात येत होता. ही पद्धतही कालांतराने बंद पडली. आता अकराव्या दिवशी बेगमपुरा, जिन्सी येथील पंजा येतात.
बड़े चाँदसाहब
भडकलगेट येथे बड़े चाँदसाहब यांची सवारी बसविण्यात येते. चेलीपुऱ्यात अनेक वर्षांपासून छोटे चाँदसाहब यांची सवारी बसविण्यात येते. काही सवाऱ्या घरासमोरही येतात. नवाबपुरा येथील हिरे कालम, इमाम-ए-खातीम, १२ इमाम, बेगमपुऱ्यातील संदलसाहब, बुढीलेन येथील कवडीपीर, अशी विविध नावे सवाऱ्यांना आहेत. महिला चांदीचे पाळणे बांधून ‘मन्नत’ मागत असतात. आमच्या घरात पाळणा हलला, तर मुलाला ‘शेर’ बनवून सवारीसाठी आणण्यात येईल, अशीही मन्नत असते, असे रशीदमामू यांनी सांगितले. गुरुवार, दि.२० सप्टेंबर रोजी सिटीचौक येथे दरवर्षीप्रमाणे मजमा भरविण्यात येणार आहे.
खाद्य संस्कृती लुप्त
मोहर्रममध्ये बेकरीत भाजून केलेल्या रोटची भयंकर क्रेझ होती. मागील २० ते २५ वर्षांमध्ये रोट तयार करणेच बंद झाले आहे. याशिवाय प्रत्येक घरी गोड चोंगे तयार करण्यात येत असत. चविष्ट सरबत तयार करण्यात येत होते. हळूहळू ही सर्व खाद्य संस्कृतीच आता लुप्त पावली आहे.