शहरात आता अर्बन फॉरेस्ट योजना; खुल्या जागेवरील अतिक्रमणावर महापालिकेचा तोडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 07:44 PM2020-12-07T19:44:17+5:302020-12-07T19:45:45+5:30
शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणपूरक शहर निर्माण होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण आवश्यक असल्याची मनपा आयुक्तांची भूमिका
औरंगाबाद : आमखास मैदानाच्या दर्शनी भागात काही नागरिकांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली होती. महापालिकेने वारंवार कारवाई केल्यानंतरही व्यापारी ताबा सोडण्यास तयार नव्हते. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अतिक्रमण काढून तेथे वृक्षारोपण केले. हा प्रयोग आता शहरात सर्वत्र अर्बन फॉरेस्ट या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणार असल्याची माहिती पाण्डेय यांनी दिली.
शहरात महापालिकेच्या किमान १,५०० ठिकाणी जागा आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या जागा पडून आहेत. काही ठिकाणी सोसायट्यांनी ले-आऊट करून खुली जागा महापालिकेला हस्तांतरित केली आहे. काही ठिकाणी वाळवंट, तर काही ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. ज्याठिकाणी सहज वृक्षारोपण करता येईल तेथे महापालिका वृक्षलागवड आणि संवर्धन करणार आहे. महापालिकेने यापूर्वी हर्सूल तलावाजवळ जांभूळ वन विकसित केले आहे. अशा पद्धतीचे प्रयोग शहरात कोणकोणत्या खुल्या जागांवर करता येऊ शकतात, याची चाचपणी प्रशासनाने सुरू केली आहे. ज्याठिकाणी वृक्षारोपण करण्यात येईल तेथे चारही बाजूंनी तार फेंन्सिंग करावी लागेल. खुल्या जागेवर लावलेली झाडे कशी जगतील, यादृष्टीने उद्यान विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. शहरी भागात जास्तीत जास्त झाडे लावणे हा महापालिकेचा उद्देश आहे. या उपक्रमात शहरातील स्वयंसेवी संस्था, वृक्षप्रेमी नागरिकांनाही सामावून घेण्यात येणार आहे.
पर्यावरणपूक शहराचे धोरण
शहरात एकवेळ रस्ते अरुंद असले तरी चालतील परंतु शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि पर्यावरणपूरक शहर निर्माण होण्याच्या दृष्टीने वृक्षारोपण आवश्यक असल्याची मनपा आयुक्तांची भूमिका असून ती त्यांनी वारंवार स्पष्ट केली आहे.