शहर पोलीस, एमएसडीसीएल विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:46 AM2017-12-26T00:46:28+5:302017-12-26T00:46:52+5:30
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस आणि एमएसडीसीएल संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली.
औरंगाबाद : गरवारे क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या राम कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत शहर पोलीस आणि एमएसडीसीएल संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. अजय कावळे आणि अमोल खरात यांनी एकाच सामन्यात झळकावलेली दणदणीत शतके ही सोमवारी झालेल्या सामन्यातील वैशिष्ट्य ठरले.
सकाळच्या सत्रात अजय कावळे याने झंझावाती फलंदाजी करताना अवघ्या ५२ चेंडूंतच १० टोलेजंग षटकार व ५ खणखणीत चौकारांसह ११० धावांची दणकेबाज खेळी केली. त्याला शेख अलीम याने ५० चेंडूंत ५ षटकार व ८ चौकारांसह ८७ धावा करीत साथ दिली. या दोघांच्या चौफेर फटकेबाजीच्या जोरावर शहर पोलीस ब संघाने २० षटकांत ३ बाद २२३ धावांचा एव्हरेस्ट रचला. आयआयए संघाकडून मिर्झा मसूद याने २, तर अमोल खरात याने १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात अमोल खरात याने ६१ चेंडूंतच ५ षटकार व ८ चौकारांसह नाबाद १०२ धावांची झुंजार खेळी केल्यानंतरही आयआयए संघ ४ बाद १६१ पर्यंत मजल मारू शकला. रझा कुरैशीने १५ धावा केल्या. शहर पोलिसकडून राजू प्रचाके याने २ व शेख अकबरने १ गडी बाद केला.
दुसºया सामन्यात एमएसडीसीएलविरुद्ध आयुर्विमा संघाने ९ बाद ७६ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून संजय जाधवने ४४ चेंडूंत २ षटकार व २ चौकारांसह सर्वाधिक ३७ धावा केल्या. एमएसडीसीएलकडून बाळासाहेब मगर याने २१ धावांत ३ व सय्यद इनायत याने ७ धावांत २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमएसडीसीएल संघाने ६.५ षटकांतच ३ गडी गमावून ७६ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून सुशील गणोरकर याने ३१ धावांत २ गडी बाद केले.