शहरातील पॉझिटिव्हिटी रेट १५ टक्क्यांपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:16+5:302021-03-06T04:04:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहरात तीन दिवसात तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यामुळे कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालयात कोरोनाचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात तीन दिवसात तीनशेपेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळल्यामुळे कोविड केअर सेंटरसह खासगी रुग्णालयात कोरोनाचे २,४०० सक्रिय रुग्ण दाखल आहेत. कोविड रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा १२ ते १५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा घट्ट होत चालला आहे. शहरातील जवळपास तीनशे कुटुंबातील सदस्य बाधित आहेत.
शहरात बाधित रुग्णांची संख्या २ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मार्चच्या २ तारखेपासून हा आकडा ३००वर गेला आहे. तीन दिवसातच एक हजारापेक्षा अधिक बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. एका घरातील एक सदस्य बाधित आढळून आल्यानंतर घरातील इतर सदस्यांनी कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केली तर ते देखील बाधित निघत असल्याचे आढळून आले आहे. आतापर्यंत शहरातील सुमारे तीनशे कुटुंबातील दोन किंवा तीन सदस्य कोरोनाबाधित निघाले असल्याचे सुत्रांनी सांगितले. शहरात दररोज किमान दोन हजार नागरिकांची तपासणी होत आहे. बाधित रुग्ण निघण्याचा रेट हा १२ ते १५ टक्के इतका आहे. साधारणपणे ५ टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असेल तर कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याचे मानले जाते. मात्र, शहराचा हा रेट १२ ते १५ टक्क्यांवर गेल्यामुळे कोरोना संसर्गाचा विळखा अधिक घट्ट होत चालल्याचे सुत्रांनी सांगितले. या रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी सात कोविड केअर सेंटरसह ४० खासगी रुग्णालयांत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.