दीड वर्षांपासून सिटी स्कॅन मशीन बंद अवस्थेत
By Admin | Published: June 2, 2017 12:07 AM2017-06-02T00:07:29+5:302017-06-02T00:19:20+5:30
बीड : मागील दीड वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील दीड वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार करणाऱ्या रुग्णांना सिटी स्कॅनसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना दोन ते अडीच हजारांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच अपघात व इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना येथे सुविधा दिली जाते; परंतु रुग्णांचे सिटी स्कॅन करण्यासाठी येथे मशीनच नसल्याने डॉक्टर नाइलाजाने त्यांना खाजगी रुग्णालयाचा रस्ता दाखवतात.
जिल्हा रुग्णालयात असणारी ही मशीन १९९४ मधील आहे. तिचे आयुष्य संपल्याचा अहवाल तंत्रज्ञांनी दिला आहे. दुरुस्तीसंदर्भात आरोग्य विभागाकडे जिल्हा रुग्णालयाने पत्रव्यवहार करून याची कल्पना दिली; परंतु त्यांनी याची अद्यापही दखल घेतली नाही. संघटनांनीही आंदोलने, उपोषणे केली; परंतु हाती यश आले नाही.
मशीन बंद असल्याने रुग्ण डॉक्टरांकडे जातात. डॉक्टर खाजगी दवाखान्याकडे बोट दाखवताच अनेक जण त्यांच्याशी वाद घालतात. अनेक वेळा रुग्णाला वादामध्ये त्रास सहन करावा लागतो. तो कमी करून जिल्हा रुग्णालयात तात्काळ मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रुग्णांसह नातेवाईकांनी केली आहे.