वाळूज महानगरात गेल्या पंधरवड्यात मोकाट कुत्र्यांनी तोडले ६६ जणांचे लचके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:19 AM2019-01-17T00:19:19+5:302019-01-17T00:19:49+5:30

मंगळवारी वाळूज महानगरातील तिघांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून, कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गत पंधरा दिवसांत ६६ नागरिकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या नागरिकांवर जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना रेबीजची लस देण्यात आली.

In the city of Walaj, 66 people were killed in the last fortnight | वाळूज महानगरात गेल्या पंधरवड्यात मोकाट कुत्र्यांनी तोडले ६६ जणांचे लचके

वाळूज महानगरात गेल्या पंधरवड्यात मोकाट कुत्र्यांनी तोडले ६६ जणांचे लचके

googlenewsNext
ठळक मुद्देभयावह : जिकठाण आरोग्य केंद्रात घेतले उपचार

वाळूज महानगर : मंगळवारी वाळूज महानगरातील तिघांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला असून, कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गत पंधरा दिवसांत ६६ नागरिकांचे मोकाट कुत्र्यांनी लचके तोडल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. या नागरिकांवर जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना रेबीजची लस देण्यात आली.
वाळूज येथील पोस्टमन विशाल विनायक मांडे, सोहम संदीब बिरदाळे व सलीम महेबूबखॉ पठाण या तिघांना मंगळवारी (दि.१५), तर बाबासाहेब लक्ष्मण जिवरग (कासोडा), किशोर कानडे (अब्दुलपूर), सचिन वाखुरे (जिकठाण), सार्थक बंडू तांबे (बोरगाव), गणेश पंढरीनाथ सवई (रांजणगाव) व सोमीनाथ, अशा ८ जणांना एकाच दिवशी चावा घेतला आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या या ८ नागरिकांना जिकठाण आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वल चव्हाण, डॉ. कैलास बाविस्कर यांनी प्राथमिक उपचार करून रेबीजची लस दिली आहे.
गत पंधरा दिवसांत वाळूज महानगरातील ६६ नागरिकांचे लचके मोकाट कुत्र्यांनी तोडल्याची नोंद जिकठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे. १ ते १५ जानेवारीपर्यंतची ही आकडेवारी असून, कुत्र्यांनी चावे घेतलेल्या काही नागरिकांनी घाटी रुग्णालय व खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असून, त्यामुळे निश्चित आकडा किती हे समजू शकले नाही.
या परिसरातील वाळूज, बजाजनगर, रांजणगाव, कासोडा, पंढरपूर, जोगेश्वरी, जिकठाण, अब्दुलपूर बोरगाव, वडगाव कोल्हाटी आदी ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या भागात नागरी वसाहतीत मोकाट कुत्र्यांच्या झुंडी फिरतात. रस्त्याने ये-जा करणारे नागरिक, लहान मुले व जनावरांवर मोकाट कुत्रे टोळीने हल्ले करीत असल्याच्या घटना सतत घडत आहेत. मुख्य बाजारपेठा, नागरी वसाहतीतही मोकाट कुत्रे ठिय्या देतात. या परिसरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, स्वच्छतेकडे ग्रामपंचायत व एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहरात पकडलेली कुत्री मनपा या परिसरात आणून सोडत असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनही डोळेझाक करीत आहे.
कुत्री करतात समूहाने करतात हल्ला
वाळूज परिसरात ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या फिरताना दिसतात. नागरी वसाहती, मुख्य रस्ते व बाजारपेठेत कुत्र्यांचा मुक्त संचार असतो. रस्त्याने ये-जा करणाºया नागरिकांवर ही मोकाट कुत्रे समूहाने हल्ला करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याचबरोबर गायी, बकºया या पाळीव प्राण्यांवरही ही मोकाट कुत्रे हल्ले करीत असल्यामुळे पशुपालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पावले उचलण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उत्तम बनकर, नीलेश बनकर, नामदेव इले, सचिन काकडे, फय्याज कुरैशी, नदीम झुंबरवाला आदींनी व्यक्त केली आहे.
रेबीज लसीसाठी पायपीट
वाळूज महानगर परिसरातील नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्यास शहरातील घाटी रुग्णालय अथवा जिकठाण येथील आरोग्य केंद्रापर्यंत पायपीट करावी लागते. त्यामुळे नागरिक खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. वाळूज येथील आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून, फर्निचर व यंत्रसामुग्री उपलब्ध होत नसल्यामुळे या परिसरातील रुग्णांची हेळसांड होत आहे. वाळूजचे प्राथमिक आरोग्य केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
 

Web Title: In the city of Walaj, 66 people were killed in the last fortnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.