शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:34 PM2019-06-07T23:34:43+5:302019-06-07T23:34:56+5:30
आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात देश, राज्य, जिल्ह्यातील विकासांच्या मुद्याऐवजी महापालिका हद्दीतील नागरी सुविधांवर जास्तीचा भर देऊन विरोधकांनी प्रचार केल्यामुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा फटका बसला. शहराला आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठ्याचा मुद्दा विरोधकांनी प्रचारात ऐरणीवर ठेवला होता. परिणामी मोठा पराभव होऊनही मनपातील सत्ताधारी युतीला जाग येत नाही. आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, नागरिकांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
महिन्यातून फक्त चार दिवस काही वसाहतींना पाणीपुरवठा होत असल्याची ओरड होत आहे. पाणीपट्टी वर्षभराची आणि पाणीपुरवठा आठ दिवसांतून एकदा, असा प्रकार पालिकेकडून होत असल्यामुळे नागरिक संतापले आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात पालिका प्रशासन कमी पडले आहे.
सिडको-हडकोत पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. सात ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक वैतागले आहेत. दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणावरील पंपगृहाच्या विद्युत तारांवर वीज पडल्यामुळे काही तास वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणने तेथे दुरुस्ती केली. मात्र, शहराच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले.
जायकवाडी धरणातून १५५ ऐवजी १३५ एमएलडी पाणी उपसा सुरू होता. गळत्यांवर मात करीत ११५ ते १२० एमएलडीच पाणी शहराला येते. दोन महिन्यांत २० एमएलडी पाणी कमी झाल्यामुळे अनेक भागांत उशिरा पाणीपुरवठा होतो आहे.
गुंठेवारी वसाहतींनी काय करावे
शहरातील ११९ पैकी ५० टक्के गुंठेवारी वसाहतींमध्ये नळ पाणीपुरवठा योजना नाही. त्या वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. नळांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्यामुळे टँकरच्या फेऱ्यादेखील लांबणीवर पडत आहेत. गुंठेवारी भागातील नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड धावपळ होत आहे. ड्रमभर पाण्यासाठी आठ दिवस वाट पाहण्यापलीकडे या नागरिकांच्या हाती काहीही राहिलेले नाही.
पालिका अभियंत्यांचा दावा असा-
जायकवाडी धरणातून पंपगृहांसाठी पाणी उपसा करण्याकरिता आपत्कालीन ६ तरंगते पंप बसविण्यात आले. त्यापैकी ५ पंप वारंवार ट्रिप होत असल्याने फारोळ्यात जलशुद्धीकरण केंद्रावर परिणाम होत असे. मनपा अभियंत्यांनी पाणीपुरवठ्यामधील तांत्रिक दोष शोधून दुरुस्ती केल्यामुळे पंप ट्रिपिंग होणे बंद झाले आहे. दरम्यान पाणीपुरवठा सुरुळीत झाल्याचा दावा कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी केला.