शहर पाणीपुरवठ्याची सूत्रे आता सुनील केंद्रेकरांकडे; कामचुकारांना गुन्हे नोंदवण्याचा दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2022 06:59 PM2022-06-04T18:59:59+5:302022-06-04T19:06:15+5:30
काम केले नाही तर गुन्हे नोंदवण्याचा इशारा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिला आहे
औरंगाबाद: शहरातील पाणीपुरवठ्याची सूत्रे शासनाने विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या हाती सोपविली आहेत. विभागीय आयुक्तांनी उपाययोजनेच्या अनुषंगाने हर्सूल, नक्षत्रवाडी एमबीआर, नवीन योजनेतील जलवाहिनी उत्पादन, फारोळा जलशुद्धिकरण प्रकल्पातील अडचणी शुक्रवारी समजून घेत महत्त्वाच्या सूचना केल्या.
सूचनेप्रमाणे येत्या काही दिवसांत निर्णय झाले नाहीतर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा आयुक्त केंद्रेकर यांनी नक्षत्रवाडी एमबीआर बैठकीत दिला. एमजेपीचे अभियंता अभयसिंह, मनपाचे अभियंता किरण धांडे, पंडित, हेमंत कोल्हे, समीर जोशी आदींची यावेळी उपस्थिती होती.
चार दिवसाआड पाणीपुरवठा व्हावा, यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न सुरू आहेत. २४ एप्रिलपासून शासनाच्या आदेशाने केंद्रेकर यांनी पाणीपुरवठा वाढण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून एमआयडीसी, हर्सूल तलावातील पाणी पूर्ण क्षमतेने मिळाल्यास चार दिवसाआड शहराला पाणी देणे शक्य होणार आहे. जुनी जलवाहिनी, गळत्या, उपसा पंप, एमबीआरची साठवण क्षमता याचा आढावा घेतल्यानंतर अनेक त्रुटी आयुक्तांच्या समोर आल्या.
मनाला येईल तशा नियोजनामुळे बट्ट्याबोळ
मनला वाटेल तसे जलवाहिनीचे जाळे वाढवित गेल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिडको-हडकोचे पाणी हर्सूलपर्यंत जात आहे, मग या भागांना पाणी कुठून मिळणार. जुन्या शहरातील पाणी सोयीनुसार वळविल्यामुळे शहागंज व परिसरात पाणी जात नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यावर हर्सूल तलावातील पाणी वापरण्याचा निर्णय झाला आहे. एमबीआर (साठवण जलकुंभ) येथील तांत्रिक बदलाच्या सूचना आयुक्तांनी केल्या तसेच १५० एचपीचा पंप बसविणे, नवीन एमबीआरची उंची वाढविणे, हर्सूल तलावातील दोन्ही शुध्दिकरण केंद्र चालू केल्यानंतर पाणीपुरवठ्यात मोठा बदल अपेक्षित असल्याचे आयुक्त म्हणाले.
हर्सूल जलवाहिनीत हंडे व गाळ
शहरात पाणीटंचाई असतांना हर्सूल तलावातील जलउपसा वाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले. त्यात रांजण, हंडे व इतर गाळ अडकून पडल्यामुळे १२ ऐवजी फक्त ३ एमएलडी पाणी जात होते. जलवाहिनी स्वच्छ केल्यामुळे आता ६ एमएलडी पाणी वाढले आहे. दुर्लक्षामुळे शुद्धिकरण बंद पडले होते. ते सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. एमआयडीसी, हर्सूल, नहर-ए-अंबरी आणि जायकवाडी असे चार स्त्रोत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने केंद्रेकर यांनी यंत्रणेची खरडपट्टी केली.