पहाटे ४ वाजता शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:02 AM2021-08-29T04:02:57+5:302021-08-29T04:02:57+5:30
औरंगाबाद : जायकवाडी पंपहाऊसजवळील १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या ...
औरंगाबाद : जायकवाडी पंपहाऊसजवळील १४०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाल्यावर शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहराचा पाणीपुरवठा पूर्ववत झाला. दुरुस्तीसाठी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाला जवळपास १२ तास लागले. यावेळेत पंपहाऊस, मुख्य जलवाहिनीवरील ठिकठिकाणी सुरू असलेल्या गळत्याही बंद करण्यात आल्या.
औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १४०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला जायकवाडी येथील पंपहाऊस जवळच मोठी गळती लागली होती. पंपहाऊसच्या परिसरात असलेल्या वीज उपकेंद्रात जलवाहिनीतून बाहेर पडणारे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचा निर्णय घेतला. १२ तासांचे शटडाऊन घेऊन कामही हाती घेतले. दरम्यानच्या काळात औरंगाबाद शहराचा जायकवाडीहून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे मुख्य जलवाहिनी कोरडी पडली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर पंपहाऊस सुरू करुन पाणीपुरवठा देखील सुरू करण्यात आला. रिकाम्या जलवाहिनीतून पाण्याचा प्रवाह सुरू झाल्यामुळे जलवाहिनीतील हवेचा दाब वाढला आणि जायकवाडी ते औरंगाबाद दरम्यान मुख्य जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह फुटण्याच्या काही घटना घडल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. फुटलेले एअर व्हॉल्व्ह लगेचच दुरुस्त करण्यात आले. रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान जायकवाडीहून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. शहरातील सर्व जलकुंभ भरल्यावर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास शहरातील विविध भागांना पाणीपुरवठा करण्यात आला. शुक्रवारी शहराच्या ज्या भागांमध्ये पाणीपुरवठा झाला नाही, त्या भागांना शनिवारी पाणी देण्यात आले अशी माहिती धांडे यांनी दिली.