शहरात ५४ पथक करणार कोरोना तपासण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:02 AM2021-03-18T04:02:26+5:302021-03-18T04:02:26+5:30
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेची सर्व यंत्रणा झोकून कामाला लागली आहे. शहरात मार्च ...
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या सूचनेनुसार कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेची सर्व यंत्रणा झोकून कामाला लागली आहे. शहरात मार्च महिन्यापासून रुग्णांची संख्या खूपच गतीने वाढते आहे. मंगळवारी शहरात १ हजार ११ रुग्ण निघाले. त्यामुळे अधिकाधिक कोरोना चाचण्या करण्यासाठी पथक वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पूर्वीपासून १० मोबाइल टीम आणि २४ तपासणी केंद्रांवर कोरोना चाचणी केली जात आहे. त्यातच आता आणखी ६ मोबाइल टीम, कंटेनमेंट झोनसाठी ६ टीम आणि शहराच्या एन्ट्री पॉईंटवर सहा ठिकाणी ६ टीम तपासण्या करणार आहेत. वाढत्या रुग्णांसाठी बेडस् व सेवा उपलब्ध करून देण्यासाठीचे नियोजनही प्रशासन करत आहे.
कन्टेनमेंट झोनच्या निकषांत बदल
आता २० पेक्षा अधिक रुग्ण आढल्यास संबंधित वसाहत पत्र्यांनी सील केली जाणार नाही, तर त्या ठिकाणी पोस्टर्स व बॅनर लाऊन ही वसाहत कन्टेनमेंट झोन असल्याचे जाहीर केले जाईल. त्या भागातीलच एका व्यक्तीस स्वयंसेवक म्हणून देखरेखीसाठी नियुक्त केले जाईल. संबंधित भागातील पालिकेच्या आशासेविका, शिक्षकांकडून रोज तेथे पाहणी करतील तसेच कोरोना चाचण्यांसाठी नोडल ऑफिसर म्हणूनही ते काम करतील. रोजचा पाहणी अहवाल ते वॉररूमला देतील. यासाठी वॉररूममध्ये मनुष्यबळ वाढवले जात आहे.
रुग्णांच्या वाहतुकीसाठी २० बस
चाचण्यांतून पॉझिटिव्ह आलेल्या कोरोना रूग्णांच्या वाहतुकीसाठी व पथकांसाठी २० स्मार्ट बस घेतल्या आहेत. सोबतच सध्या दोन मनपाच्या अॅम्ब्युलन्स व चार भाडेतत्वावर सुरू असून त्यात आणखी १० नवीन अॅम्ब्युलन्स सुरू करण्यात येणार आहेत.