शहरात भुरट्या चोरांचा उपद्रव थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:04 AM2021-08-01T04:04:42+5:302021-08-01T04:04:42+5:30
औरंगाबाद : शहरात मागील दहा दिवसांपासून प्रत्येक दिवशी घर, दुकानफोडीची घटना उघडकीस येत आहे. औरंगपुऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या होलसेल दुकानात ...
औरंगाबाद : शहरात मागील दहा दिवसांपासून प्रत्येक दिवशी घर, दुकानफोडीची घटना उघडकीस येत आहे. औरंगपुऱ्यातील मध्यवस्तीत असलेल्या होलसेल दुकानात चोरीची घटना घडली. त्याच रात्री उच्चभ्रूंची वसाहत असलेल्या ज्योतीनगरमध्ये मेडिकल दुकान फोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी रोख पैशांसह साहित्यही चोरून नेले आहे.
उस्मानपुरा परिसरातील ज्योतीनगरमध्ये राहुल रमेशराव दार्व्हेकर (४४, रा. एन-२, सिडको) यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. गुरुवारी रात्री ११ वाजता दार्व्हेकर हे मेडिकल बंद करून घरी गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटून मेडिकलमध्ये प्रवेश केला. चोरट्याने मेडिकल स्टोअर्समधून १० हजार ५०० रुपये रोख, कॅडबरी चॉकलेट ३ बॉक्स, विविध कंपन्यांचे स्प्रे व सौंदर्य प्रसाधने, कंडोमचे ३ बॉक्स, शिलाजीत कॅप्सूल असा एकूण २९ हजार ८०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. शुक्रवारी सकाळी ९ वाजता दार्व्हेकर हे मेडिकल स्टोअर्स उघडण्यासाठी गेले असता त्यांना चोरीचा हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जमादार सोनवणे करीत आहेत.
चौकट..........
दहा दिवसात घडलेल्या घटना
- २१ जुलै रोजी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील एक मेडिकलचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख पैशांसह सुगंधी द्रव्ये चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.
- २२ जुलै रोजी सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवदर्शनाला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी १४ हजार रुपये किमतीचे दागदागिने चोरले.
- उस्मानपुरा भागातील एका घरात ठेवलेल्या ३९ हजार रुपयांच्या सामानाची चोरी. ही घटना २२ जुलै रोजी उघडकीस आली.
- २३ जुलै रोजी प्रतापनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. त्यातील एका फ्लॅटमध्ये मेहुण्याच्या अंत्यविधीला गेलेल्या कुटुंबाचा २ लाख ४६ हजार १५७ रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला.
- २३ जुलै रोजी भविष्य सांगण्याच्या बहाण्याने दोन भोंदूबाबांनी महिलेच्या सोन्याच्या अंगठीसह ३२ हजारांचा माल मुकुंदवाडी परिसरातून लंपास केला. हे भोंदूबाबा पकडले आहेत.
- २३ जुलै रोजी जिन्सी पोलीस ठाण्याच्या परिसरातील एका घरी दोन भोंदूबाबांनी महिलेच्या घरात घुसून भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आठ हजार रुपये लुटले.
- हिलाल कॉलनी येथील एक कुटुंब खुलताबाद येथील दर्ग्यात दर्शनासाठी गेले असता, २३ जुलैच्या दुपारी चोरट्यांनी घर फोडले. यात १ लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
- २५ जुलै रोजी सिल्लेखाना चौकातील एका हॉस्पिटलमध्ये विविध सामानाची चोरी झाली. यामध्ये ६५ हजार रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
- सेव्हन हिल परिसरातील पुण्याला गेलेल्या सेवानिवृत्त शिक्षिकेच्या घरी चोरी झाल्याची घटना २८ जुलैला उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी १ लाख ४० हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला.
- सातारा परिसरात २७ जुलै रोजी चोरीच्या घटनेत रोख २० हजार रुपयांसह एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
- औरंगपुरा परिसरातील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या व्यंकटेश इलेक्ट्रिकल या दुकानात २९ जुलैच्या मध्यरात्री दोनच्या दरम्यान चोरी झाली. यात २ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.