शहराला पाणी टंचाईच्या झळा बसणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:04 AM2021-03-06T04:04:46+5:302021-03-06T04:04:46+5:30
औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन ...
औरंगाबाद : उन्हाळ्यात औरंगाबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसणार नाहीत, यादृष्टीने महापालिकेकडून योग्य ते नियोजन करण्यात येईल. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांना सांगितले.
उन्हाळा सुरू होताच शहरात पाणीटंचाईला सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी दुपारी महापालिका प्रशासन आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. औरंगाबाद शहराच्या जीवन गुणवत्तेत सुधारणा झाली आहे, याची पावती गुरुवारी केंद्र शासनाने दिली. या पत्रकार परिषदेत महापालिका आणि राज्य शासनाने केलेल्या विकास कामांची माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना विचारण्यात आलेल्या पाणीप्रश्नावर देसाई म्हणाले की, राज्य शासनाने नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. योजनेचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. योजना पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. तेव्हापर्यंत शहराला पाणीटंचाई भासणार नाही, याची काळजी राज्य शासन आणि महापालिका घेणार आहे. लवकरच महापालिका एक बैठक घेऊन पाणी कसे वाढवता येईल यावर निर्णय घेणार आहे.
प्रशासकांचे पूर्वीपासूनच प्रयत्न
दोन आठवड्यांपूर्वी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेऊन, शहराचे पाणी कसे वाढवता येईल यावर चर्चा केली. ज्या ठिकाणी महापालिकेच्या जलवाहिन्या अत्यंत खराब झालेल्या आहेत तेथे समांतर दुसरी लाईन टाकून पाणी वाढविण्यासाठी किती खर्च येईल याचा प्रस्तावही पाण्डेय यांनी मागविला आहे.