शहराला पाणी कमी पडणार नाही - महापौर
By Admin | Published: February 18, 2016 11:36 PM2016-02-18T23:36:40+5:302016-02-18T23:45:31+5:30
नांदेड : शहराला पिण्यासाठी पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे महापौर शैलजा स्वामी यांनी स्पष्ट केले आहे़
नांदेड : शहराला पिण्यासाठी पाण्याची कोणतीही कमतरता पडणार नाही, असे महापौर शैलजा स्वामी यांनी स्पष्ट केले आहे़ दिवंगत नेते माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीमुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले़
महापौर स्वामी यांनी गुरुवारी आसना नदीवरील बंधाऱ्यास भेट दिली़ इसापूर येथून नांदेड शहरासाठी आसना नदीमध्ये पाणी सोडले जाणार आहे़ या बंधाऱ्याच्या मजबुतीकरणाचे काम सध्या सुरू आहे़ या कामाचा स्वामी यांनी आढावा घेतला़ यावेळी उपमहापौर शफी अहमद कुरेशी, सभागृह नेता विरेंद्रसिंघ गाडीवाले, सभापती अनुजा तेहरा, आयुक्त सुशील खोडवेकर, उदय देशमुख, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, उपअभियंता आडसुळे आदींची उपस्थिती होती़
विष्णुपूरी प्रकल्पामुळे शहराची तहान आतापर्यंत भागली आहे़ यंदा दुष्काळाची तीव्रता वाढल्याने शहराला इसापूर धरणातून पाणी आणण्याचे काम माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण आणि आ़ डी़ पी़ सावंत यांच्या माध्यमातून झाले आहे़ त्याचवेळी आता आसना नदीच्या पात्राच्या खोलीकरणाचे कामही महापालिकेने सुरू केले आहे़ या कामामुळे शहराला एक महिना पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे़ जवळपास १ दलघमी पाणी मिळणार आहे़ त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्याची कोणतीही कमतरता भासणार नाही असे महपौरांनी सांगितले़
मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांची परिस्थिती पाहता नांदेड जिल्ह्यात समाधानकारक परिस्थिती असून यासाठी दूरदृष्टीच्या नेत्यांचे कार्य महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या़
(प्रतिनिधी)