शहराचा झाला ‘कचरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:37 AM2017-08-31T00:37:51+5:302017-08-31T00:37:51+5:30
आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.
मुजीब देवणीकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात औरंगाबाद शहर साफसफाईच्या बाबतीत २९९ क्रमांकावर फेकले गेले. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाºयांनी विरोधकांच्या मदतीने प्रशासनावर जोरदार तोफ डागली. प्रशासनानेही वेळ काढून नेण्यासाठी त्वरित शहर स्वच्छतेसाठी दहा कलमी कार्यक्रम जाहीर केला. या दहापैकी एकाही कलमाची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही. सत्ताधाºयांनीही कधी प्रशासनाला जाब विचारण्याची हिंमत दाखविली नाही. जसे आपले पदाधिकारी तसेच प्रशासन म्हणायची वेळ औरंगाबादकरांवर आली आहे. कारण आज शहरात जिकडेतिकडे कचºयाचे ढीग दिसून येत आहेत. दोन-दोन दिवस कचराच उचलला जात नाही.
शहरात दररोज ५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कामासाठी मनपाने १,५०० पेक्षा अधिक सफाई कामगार नेमले आहेत. तसेच भाडेकरारावर ट्रॅक्टर, डम्पर, डिप्पर घेतले आहेत. ११५ वॉर्डांमध्ये डोअर टू डोअर कलेक्शनच्या नावावर १५० रिक्षा भाडेकरारावर लावल्या आहेत. या वाहनांचे भाडे दर महिन्याला तब्बल १ कोटीपर्यंत जाते. सिडको-हडकोत १४ महिला बचत गटांकडून साफसफाई करण्यात येते. या बचत गटांचा महिना खर्च ४० लाखांपेक्षा अधिक आहे. दरवर्षी फक्त कचरा उचलण्यासाठी महापालिका ६० कोटी रुपये खर्च करते.