शहरातील कचरापुराण; पालकमंत्री, खासदारांना महिलांनी विचारला जाब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:01 PM2018-05-03T13:01:36+5:302018-05-03T13:03:26+5:30
महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही सेवानिवृत्त महिलांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा.चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातील कचरापुराण केव्हा संपणार याप्रकरणी जाब विचारला.
औरंगाबाद : महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर मंगळवारी शहरातील शिक्षण क्षेत्रातील काही सेवानिवृत्त महिलांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खा.चंद्रकांत खैरे आणि महापौर नंदकुमार घोडेले यांना शहरातील कचरापुराण केव्हा संपणार याप्रकरणी जाब विचारला. पोलीस आयुक्तालयातील मैदानावर घडलेल्या या प्रसंगात महिला शिष्टमंडळासोबत सभागृह नेते विकास जैन यांनी उर्मट भाषा वापरल्यामुळे तेथील वातावरण तापले. उपस्थितांनी मध्यस्थी करून तो वाद मिटविला.
डॉ. स्मिता अवचार, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका चित्रलेखा मेढेकर, सुरेखा दंडारे आदी महिला, नागरिकांचे शिष्टमंडळ मंगळवारी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानंतर पालकमंत्री डॉ.सावंत यांना भेटले. शहरातील कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचऱ्याचा प्रश्न सुटत नाही. यावर लक्ष घालतो असे बोलून पालकमंत्री पुढे गेले. नंतर मेढेकर या डॉ.सावंत, खा.खैरे, महापौरांशी बोलत होत्या. इतके दिवस झाले कचऱ्याची समस्या का सुटत नाही. तुम्ही प्रथम नागरिक आहात. वर्षानुवर्षे तुम्ही जिल्ह्याचे नेतृत्व करीत आहात, तुम्ही काय करीत आहात, असा सवाल शिष्टमंडळाने त्यांना केला. त्यावर खा.खैरे संतापून म्हणाले, मनपा कामे करते आहे; परंतु नागरिकांची काही जबाबदारी आहे की नाही.
ही चर्चा सुरू असताना सभागृह नेते विकास जैन तेथे आले. ते सदरील महिलांवर संतापले. त्यामुळे महिलाही संतप्त होऊन म्हणाल्या, आम्हाला विचार करावा लागेल. यापुढे तुम्हाला मतदान करायचे की नाही. ते म्हणाले, आम्हाला तुमच्या मतांची गरज नाही. दरम्यान, खैरेंनी संतप्त शिष्टमंडळाला कार्यालयावर येण्याचे निमंत्रण देऊन निघून गेले. सगळे शहर स्वच्छ केल्याचा दावा महापौर, खासदार करीत आहेत. पुष्पनगरी व समर्थनगर भागात कचरा आणून टाकला जात आहे. त्यामुळे मेढेकर यांच्यासह महिलांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले होते.
आधी उर्मटपणा नंतर माफीनामा
या घटनेनंतर नगरसेवक ऋषिकेश खैरे, आनंद तांदुळवाडीकर आदी मेढेकर, अवचार यांच्या घरी गेले, त्यांची माफी मागितली. काही कामे असतील तर हक्काने सांगावे, असेही नगरसेवक खैरे यांनी मेढेकर यांना सांगितले. अशी माहिती प्रत्यक्ष उपस्थित असलेल्यांनी दिली.
आणि सभागृह नेते चिडले
शिष्टमंडळ खैरे यांना जाब विचारत असताना मनपा शिवसेना सभागृह नेते विकास जैन चिडले. खासदारांशी बोलताना झोपडपट्टीसारखी भाषा वापरू नका, कचरा या विषयावर बोलण्याची ही जागा आहे का? असा उलट प्रश्न त्यांनी महिलांना केल्यामुळे वातावरण तापले. उपस्थितांनी मध्यस्थी करून ते प्रकरण मिटविले.