शहराचा पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 05:10 PM2018-05-02T17:10:17+5:302018-05-02T17:13:38+5:30
शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे.
औरंगाबाद : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये अगोदरच ‘पाणीबाणी’ची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली असताना सोमवारी रात्री महापालिकेने मंगळवारपासून होणारा पाणीपुरवठा एक दिवसासाठी पुढे ढकलला आहे. त्यामुळे मंगळवारी ज्या वसाहतींना पाणीपुरवठा होणार होता तो आता बुधवारी होणार आहे. जायकवाडीहून येणारे पाणी आणि मागणी यात दुप्पट फरक पडला आहे.
मागील सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाणी प्रश्नावर तब्बल पाच तास घसा कोरडा केला होता. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाणीपुरवठा विभागाला सक्त ताकीद दिली होती की, तीन दिवसांत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा; अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. महापालिकेतील सर्वोच्च सभागृहाचा आदेशही पाणीपुरवठा विभागाने पायदळी तुडविला. शहरातील एकाही वसाहतीचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात अधिकाऱ्यांना यश आले नाही. शहरातील पन्नास टक्के वॉर्डांना ऐन कडक उन्हाळ्यात पाचव्या आणि सहाव्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतोय. मोजक्याच वॉर्डांवर हा अन्याय होत असतानाही संबंधित वॉर्डाचे नगरसेवकही मूग गिळून आहेत.
कधी तरी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याशिवाय दुसरे काहीच करीत नाहीत. त्यातच सोमवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा अपुरा होत आहे. उंच भागातील टाक्या भरण्यास त्रास होतो. त्यामुळे मंगळवार १ मेपासून शहरातील पाणीपुरवठाच एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. मंगळवारी ज्या वसाहतींना पाणी देण्यात येणार होते त्यांना बुधवारी पाणी मिळेल. बुधवारी ज्या नागरिकांना पाणी देण्यात येणार होते त्यांना आता गुरुवारी आणि शुक्रवारचा पाणीपुरवठा शनिवारवर ढकलण्यात आला आहे. महापालिकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जुन्या शहरातील वॉर्डांना बसणार आहे. अगोदरच या भागातील वॉर्डांना पाचव्या दिवशी पाणी मिळत असे. मनपाने आणखी एक दिवसाची भर टाकली आहे.