‘सिव्हिल’ झाले फुल्ल, घाटी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:03 AM2021-03-14T04:03:51+5:302021-03-14T04:03:51+5:30
खासगी रुग्णालयांतही खाटांची अडचण : लक्षणे नसलेल्या रुग्णांना जावे लागणार महापालिकेच्या काेविड केंद्राला औरंगाबाद : काेराेना रुग्णसंख्येत काही दिवसांतच ...
खासगी रुग्णालयांतही खाटांची अडचण : लक्षणे नसलेल्या रुग्णांना जावे लागणार महापालिकेच्या काेविड केंद्राला
औरंगाबाद : काेराेना रुग्णसंख्येत काही दिवसांतच माेठी वाढ झाल्याने आराेग्य यंत्रणेची कसाेटी लागत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटा रुग्णांनी फुल्ल झाल्या आहेत; तर घाटी प्रशासनाने यापुढे केवळ गंभीर रुग्णांनाच दाखल करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या रुग्णांची भिस्त महापालिकेच्या काेविड केअर सेंटरवरच उरली आहे.
शहरातील उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या चार हजारांवर गेली आहे. सरकारी रुग्णालयांबरोबर खासगी रुग्णालयांत खाटा मिळण्यासाठी कोरोना रुग्णांना भटकंती करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या शनिवारी सायंकाळपर्यंत २७२ झाली. या ठिकाणी ३०० खाटांची व्यवस्था असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. घाटीत तब्बल ३७४ रुग्ण भरती आहेत. यात तब्बल २१३ रुग्ण गंभीर आहेत; तर १६१ रुग्ण सामान्य स्थितीतील आहेत. कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर रुग्ण थेट घाटीत येतात. त्यामुळे रूम एअरवरील म्हणजेच सामान्य प्रकृती असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यातून गंभीर रुग्णांना पुढील दिवसांत खाटा मिळणे अवघड होण्याची स्थिती उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे केवळ गंभीर रुग्णांनाच घाटीत रेफर करावे, असे आवाहन घाटी प्रशासनाने केले आहे.
घाटी प्रशासनाचे आवाहन
ग्रामीण भागांतील रुग्णांनी प्रारंभी जिल्हा रुग्णालयात जावे. तेथून परिस्थिती पाहून रुग्ण कुठे दाखल करायचा, हा निर्णय तेथे घेतला जाईल. घाटीत केवळ ऑक्सिजनची गरज असलेले रुग्ण आणि ज्यांचे वय ६० वर्षांवरील आहे, सोबत व्याधी आहे, अशा रुग्णांनाच दाखल करण्यात येईल. लक्षणे नसलेल्या रुग्णांनी महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये जावे.