आयकर अधिकारी असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला मागितली ६० लाखांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 07:14 PM2021-08-27T19:14:35+5:302021-08-27T19:15:38+5:30

आयकर विभागाचा दीड ते दोन कोटी रुपयांचा कर बुडविला असल्याची तक्रार आपल्याविरोधात दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Claiming to be an income tax officer, he demanded a ransom of Rs 60 lakh from the builder | आयकर अधिकारी असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला मागितली ६० लाखांची खंडणी

आयकर अधिकारी असल्याचे सांगून बांधकाम व्यावसायिकाला मागितली ६० लाखांची खंडणी

googlenewsNext
ठळक मुद्देतक्रारदाराचे बांधकाम व्यवसायातील भागीदार असलेल्यांनी खंडणीची ही तक्रार खोटी असल्याचा दावा

औरंगाबाद : आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून दीड ते दोन कोटी रुपयांचा आयकर बुडवला आहे. हे प्रकरण बाहेरच मिटवायचे असेल तर ६० लाख रुपये द्यावे लागतील. शेवटी तडजोडीअंती ४५ लाखावरून ४० लाख रुपयांपर्यंत खाली आले. या प्रकरणातील तक्रारदाराने चर्चेचा व्हिडिओ तयार केला असून, जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून तीन जणांच्या विरोधात खंडणी, फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान, तक्रारदाराचे बांधकाम व्यवसायातील भागीदार असलेल्यांनी खंडणीची ही तक्रार खोटी असून, आमच्या व्यवहारातील पैसे बुडविण्यासाठी केलेला हा बनाव असल्याचा दावा तक्रारीद्वारे केला आहे.

शिवशंकर कॉलनी येथील रहिवासी सुशांत दत्तात्रय गिरी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्लॉट खरेदी- विक्रीचा व्यवसाय करणारे संजय पारख यांनी ७ ऑगस्ट रोजी संपर्क साधला व दीड ते दोन कोटी रुपयांचा कर बुडविला असल्याची तक्रार आयकर विभागात दाखल झाली असून, हे प्रकरण बाहेरच मिटविण्यासाठी भेटण्यास बोलावले. त्यानुसार १० ऑगस्ट रोजी बीड बायपास रोडवरील हॉटेल बासू येथे ते घेऊन गेले. त्याठिकाणी बसलेले अरविंद जवळगेकर यांची ओळख आयकर अधिकारी आणि महेश चौधरी त्यांचे पीए म्हणून करून दिली. आयकर विभागाचा दीड ते दोन कोटी रुपयांचा कर बुडविला असल्याची तक्रार आपल्याविरोधात दाखल झाली असल्याचे त्यांनी सांगितले. हे प्रकरण मिटवायचे असेल, तर ६० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केली; मात्र एवढा मोठा व्यवहार झालेला नसताना कर बुडविला कसा, असा प्रश्न उपस्थित झाला. त्याचवेळी पैसे न दिल्यास डी. के. पाटील आत्महत्या प्रकरणात फसविण्याची धमकी दिली. यानंतर ११ ऑगस्ट रोजी संजय पारख यांनी पुन्हा भेटण्यास बोलावले व तडजोडीअंती ४५ लाख रुपयांची मागणी आली, हे पैसे जुन्या चलनातील नोटात देण्याचे सांगितले, असे गिरी यांनी तक्रारीत म्हटले. यावरून जवाहरनगर ठाण्यात गुरुवारी सायंकाळी तिघांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी महेश चौधरी यांना ताब्यात घेतले आहे.

तीन कोटींचा हिशेब मागितल्यामुळे अडकवले गुन्ह्यात
तक्रारदार सुशांत गिरी आणि आत्महत्या केलेले डी.के. पाटील यांची भागिदारी असलेली जी.पी. डेव्हलपर्स संस्था असून, या संस्थेच्या नावाने अलोकनगर आणि नक्षत्रवाडी भागात बांधकामाच्या दोन साईट सुरू आहेत. यातील १२ फ्लॅट सुशांत गिरी यांनी विक्री केले आहेत. डी.के. पाटील यांनी १० मे २०१९ रोजी आत्महत्या केली. त्यानंतर डी.के. पाटील यांच्या कुटुंबाने गिरी यांच्याकडे वारंवार बांधकाम व्यवहाराचा हिशेब मागितला; मात्र तो गिरी यांनी अद्यापपर्यंत दिलेला नाही. तो देण्यासाठी डी.के. पाटील यांच्या बहिणीचा मुलगा हॉटेल व्यावसायिक महेश चौधरी यांनी त्यांचे मित्र इन्शुरन्स इव्हेस्टिगेशन पॅनलवर असणारे अरविंद जवळगेकर यांचा सल्ला घेतला. यावर कायदेशीर बाबी तपासून वकिलांच्या माध्यमातून सुशांत गिरी यांच्यासह इतरांकडून २८ जुलै रोजी हिशेब मागितला. तो न दिल्यामुळे १० ऑगस्ट रोजी आयकर विभागात डी.के. पाटील व गिरी यांच्यातील भागीदारीच्या हिशेबासाठी तक्रार दिली. बीड बायपास येथील हॉटेलमध्ये प्रकरण मिटविण्यासाठी चौधरी, जवळगेकर आणि पारख यांनी मध्यस्थी केली. तडजोडीअंती ४५ लाख रुपये देण्याचे गिरी यांनी मान्य केले; मात्र त्यांनी ते न देताच मोडतोड करून व्हिडिओ तयार करीत मध्यस्थी करणारांनाच अडकवले. त्यांना तीन कोटी रुपयांचा हिशेब द्यायचा नसल्यामुळेच हा प्रकार केल्याची तक्रार डी.के. पाटील यांच्या कुटुंबीयांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट रोजी दिली आहे.

Web Title: Claiming to be an income tax officer, he demanded a ransom of Rs 60 lakh from the builder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.