सैनिक असल्याचे सांगून ओएलएक्सवरील व्यवहारात शेतकऱ्याला ५१ हजारांना फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 12:38 PM2021-02-13T12:38:22+5:302021-02-13T12:40:13+5:30
Claiming to be a soldier, he cheated a farmer of Rs 51,000 in a transaction on OLX सैन्यदलातील व्यक्ती आपल्याशी खोटे बोलणार नाही, असे वाटल्याने शेतकऱ्याने ऑनलाईन ५१ हजार ८७८ रुपये पाठवून दिले.
औरंगाबाद: ओएलएक्सवर दुचाकी खरेदीचा व्यवहार करताना भामट्याने एकाला ५१ हजार ८७८ रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. याप्रकरणी सातारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार मिथुन केशव पवार (रा. कांचनवाडी ) हे शेती करतात. त्यांना दुचाकी खरेदी करायची होती. ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून त्यांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव श्रीकांत सांगून आपण सैन्यदलात असल्याचे सांगितले. त्याची दुचाकी ५५ हजार रुपयांमध्ये विक्री करण्याची तयारी त्याने दर्शवली. ऑनलाईन पैसे पाठविल्यास ट्रान्सपोर्टमधून तुम्हाला दुचाकी पाठवून देतो असे त्याने पवार यांना विश्वासाने सांगितले.
सैन्यदलातील व्यक्ती आपल्याशी खोटे बोलणार नाही. असे समजून पवार यांनी त्याला ऑनलाईन ५१ हजार ८७८ रुपये पाठवून दिले. मात्र त्याने दुचाकी पाठविली नाही. मुदतीत दुचाकी आली नसल्याने त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी सातारा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक गोरे तपास करीत आहेत.