वर्गाच्या आडून ‘शाळा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:32 AM2017-07-08T00:32:29+5:302017-07-08T00:40:28+5:30
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये पाचवी तसेच आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठीचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहेत. तथापि, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद टिकून राहावे, यासाठी केलेला हा खटाटोप असल्याचे बिंग आज शिक्षण समितीच्या बैठकीत फुटले.
शिक्षण समितीच्या सभापती मीनाताई शेळके यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख, शिक्षण प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे आदींसह गटशिक्षणाधिकारी व सदस्य उपस्थित होते. नैसर्गिक वाढीनुसार जिल्हा परिषद शाळांना वरचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी द्यायला हरकत नाही, अशा चर्चेला बैठकीत सुरुवात झाली.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथी आणि काही ठिकाणी सातवीपर्यंत शाळा आहेत. गावातील शाळेत ज्या व्यक्तीचा पाल्य शिकत आहे, अशा व्यक्तीलाच शालेय व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष होता येते. बहुतांशी ठिकाणी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुले जवळच्या खाजगी शाळांत प्रवेश घेतात. त्यामुळे पाल्याने शाळा सोडली की संबंधितांस शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदसुद्धा सोडावे लागते. अध्यक्षपद टिकून राहावे, यासाठी बहुतांशी समिती अध्यक्षांनी शाळेला पाचवी तसेच आठवीचे वर्ग नव्याने सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडे परवानगी मागितलेली आहे.
दरम्यान, शिक्षण सभापती मीनाताई शेळके यांनी या विषयानुसार निर्णय जाहीर केला की, शासन नियमानुसार पाचवीचा वर्ग सुरू करण्यासाठी एक किलोमीटर परिघात दुसरी शाळा नसावी आणि आठवीच्या वर्गासाठी शाळेच्या परिघात तीन किलोमीटर अंतरापर्यंत शाळा नसावी. या नियमाचे पालन करून पात्र प्रस्तावांना नवीन वर्ग सुरू करण्याची परवानगी द्यावी.