स्वच्छ भारत अभियानचा वडवणीत बोजवारा
By Admin | Published: November 13, 2014 12:22 AM2014-11-13T00:22:48+5:302014-11-13T00:52:57+5:30
राम लंगे , वडवणी केंद्र व राज्य शासनाकडून निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मात्र वडवणी तालुक्यात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे.
राम लंगे , वडवणी
केंद्र व राज्य शासनाकडून निर्मल भारत अभियानाची सुरुवात करण्यात आली. मात्र वडवणी तालुक्यात या अभियानाचा पुरता बोजवारा उडाला आहे. १७ हजारापैकी केवळ ५ हजार कुटुंबांकडेच शौचालय असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे ग्रा.पं. सदस्यांकडेही शौचालय नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
केंद्र व राज्य शासन राबवित असलेल्या निर्मल भारत अभियानाचे २ आॅक्टोबर १४ पासून स्वच्छ भारत अभियान असे नामकरण करण्यात आले. फक्त स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमातून वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी १२ हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय ७ नोव्हेंबरला निर्गमित करण्यात आला. असे परिपत्रकही शासनाकडून हाती आले आहे.
वडवणी तालुक्यात एकूण १६ हजार ९७० कुटुंब संख्या आहे. त्यापैकी ५ हजार ६२९ कुटुंबच फक्त शौचालयाचा वापर करीत आहेत. आजही ११ हजार ३४१ कुटुंबांकडे शौचालय नाहीत. त्यातच तालुक्यात ग्रामपंचायतची संख्या ३६ असून, या ग्रामपंचायतमध्ये सदस्यांची संख्या ३०२ आहे. विशेष म्हणजे ग्रा.पं. सदस्यांकडेही शौचालय नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३०२ सदस्यांपैकी ६२ सदस्यांकडे शौचालयच नाहीत. शौचालय बांधण्यात ग्रामपंचायतचीही उदासिनता असल्याचे यावरुन साफ दिसून येते.
यापूर्वी वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी १० हजार रुपये अनुदान निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून देण्यात येत होते. स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असून, वैयक्तिक शौचालय बांधकाम करण्यासाठी १२ हजार रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शौचालय बांधण्याकडे वळले आहेत.
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांनाही या प्रोत्साहनपर अनुदानाचा फायदा होत आहे.
याबाबत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.बी. राऊत म्हणाले, शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार व्यक्तिगत शौचालयासाठी १२ हजाराचे अनुदान देण्यात येणार असून, त्याची पूर्तता लवकरच करण्यात येणार आहे.
तर गटविकास अधिकारी सी.एम.ढोकणे म्हणाले, ज्या ग्रा.पं. सदस्याकडे तसेच नागरिकांकडे शौचालय नाहीत अशा लोकांना शौचालय बांधण्यासाठी पुढे आणले जाईल. त्यांना भेटून मार्गदर्शन करण्यात येईल.