‘स्वच्छ महाराष्ट्र’चे काम अर्ध्यावरच!
By Admin | Published: May 27, 2017 12:41 AM2017-05-27T00:41:08+5:302017-05-27T00:42:01+5:30
जालना : आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरी व ग्रामीण भाग संपूर्ण पाणंदमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी आठ पालिका क्षेत्रांत शंभर टक्के निधी खर्र्चूनही स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे केवळ ४६.६४ टक्केच काम पूर्ण झाले आहे.
नागरी क्षेत्रातील जालना, परतूर, अंबड, भोकदरन नगरपरिषदा व घनसावंगी, मंठा, जाफराबाद व बदनापूर नगरपंचायत क्षेत्रात २०१५ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणानुसार २४ हजार ७३४ कुटुंब उघड्यावर शौचास जातात. ही संख्या लक्षात घेता मार्च २०१७ अखेर २४ हजार ३७६ स्वच्छतागृह बांधण्याचे निश्चित करण्यात आले होते. याकरिता सर्वच नगरपरिषदांनी मोठी यंत्रणा कामाला लावली. जनजागृती मोहिमेसह उघड्यावर जाणाऱ्यांवर गुड मॉर्निंग पथकांमार्फत गुन्हेही दाखल करण्यात आले. परंतु स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट अपूर्णच आहे. वरील आठ शहरांमध्ये २६ मे २०१७ अखेर अकरा हजार ३६७ कुटुंबांनी स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तर दहा हजार ९८८ स्वच्छतागृहांचे बांधकाम प्रगतीपथावर असल्याचे शासकीय यंत्रणा सांगत आहे. स्वच्छतागृहांच्या बांधकामात अंबड, परतूर, भोकरदन या नगरपरिषदांचे काम समाधानकारक असले तरी जालना, घनसावंगी, जाफराबाद, मंठा आणि बदनापूर शहरांमधील बहुतांश कामे अपूर्ण आहेत.
स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी २१ कोटी २० लाखांचा निधी मंजूर असला, तरी आतापर्यंत २२ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांचा वापर हा सक्तीचा नव्हे तर आरोग्याच्या दृष्टीने नियमित सवयीचा भाग बनावा, हे जोपर्यंत प्रत्येकाला पटत नाही. तोपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण पाणंदमुक्ती अशक्य आहे. दरम्यान, नगर विकास विभागाचे सचिव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे जालना जिल्ह्यातील स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामाचा आढावा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.