पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफसफाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:04 AM2021-04-27T04:04:31+5:302021-04-27T04:04:31+5:30
औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई करून पावसाळ्यात कोणाचीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा ...
औरंगाबाद : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची चांगल्या प्रकारे साफसफाई करून पावसाळ्यात कोणाचीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिल्या. नाल्यांच्या स्वच्छतेसह मान्सूनपूर्व कामांची गती वाढविण्यासाठी आणखी एक पोकलॅन, ४ जेसीबी, १० टिप्पर खरेदी करण्याचे आदेशदेखील त्यांनी यांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
शहरातील मान्सूनपूर्व नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामासंदर्भात पाण्डेय यांनी सोमवारी आपल्या दालनात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सद्य:स्थितीत शहरात सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा झाली. सध्या नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामासाठी ३ पोकलॅन, ६ जेसीबी, ८ टिप्पर व ९ हॉपर देण्यात आलेे आहेत. ही यंत्रणा अपुरी असल्याने नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी आणखीन एक पोकलॅन, चार जेसीबी, दहा टिप्पर खरेदी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच आयुक्तांनी मान्सूनपूर्व नाला स्वच्छतेची कामे अधिक चांगल्या पद्धतीने करण्याची दक्षता घ्यावी. पावसाळ्यात कोणाचीही तक्रार येणार नाही, अशा पद्धतीने व्यवस्थित नाल्यांची स्वच्छता करा, अशा सूचना सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीत उपायुक्त अपर्णा थेटे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नंदकिशोर भोंबे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, बी. डी. फड, यांत्रिकी विभाग अभियंता अमोल कुलकर्णी, उपअभियंता देविदास पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.
इमारतीखालील नाल्यांचा खर्च संबंधितांकडून शहरातील नाल्यावर पालिकेने लिजवर दिलेल्या इमारतीच्या खालील नाल्याची स्वच्छता करून संबंधितांना नाल्यांच्या स्वच्छतेच्या कामाचे बिल देऊन ते वसूल संबंधित इमारतधारकांकडून वसूल करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.