२४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 12:49 AM2018-06-08T00:49:26+5:302018-06-08T00:49:51+5:30
विभागीय क्रीडा संकुलावर असलेले घाणीचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या विभागीय आयुक्त आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना २४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा, असा आदेश दिला. त्याचप्रमाणे खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळाव्यात व विभागीय क्रीडा संकुलाचे स्वरूप बदलण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली असल्याचे भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.
औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर असलेले घाणीचे साम्राज्य, दारूच्या बाटल्या पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या विभागीय आयुक्त आणि क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना २४ तासांच्या आत क्रीडा संकुल स्वच्छ करा, असा आदेश दिला. त्याचप्रमाणे खेळाडूंना मूलभूत सुविधा मिळाव्यात व विभागीय क्रीडा संकुलाचे स्वरूप बदलण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंत मुदत दिली असल्याचे भापकर यांनी पत्रकारांशी बोलताना आज सांगितले.
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज विभागीय क्रीडा संकुलाला भेट दिली आणि पाहणी केली. खेळाडू, नागरिकांना विभागीय क्रीडा संकुलावर अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आणि आपल्या स्तरावर विभागीय क्रीडा संकुलासाठी वेळ देता न आल्याचेही भापकर यांनी मान्य केले. ते म्हणाले, ‘विभागीय क्रीडा संकुलात अडचणी आहेत, २४ तासांच्या आत विभागीय क्रीडा संकुलातील कोपरान्कोपरा स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्रीडा संकुलावर सातत्याने लक्ष ठेवण्यासाठी ७ समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या क्रीडा संकुलाचा आढावा घेऊन अहवाल तयार करतील. त्याचप्रमाणे २ ते ३ महिन्यांत विभागीय क्रीडा संकुल समितीची बैठक घेण्यात येणार आहे.’
पाहणीदरम्यान त्यांना विभागीय क्रीडा संकुलात कचरा आणि दारूच्या बाटल्याही आढळल्या. विभागीय क्रीडा संकुलाची भिंतीची कम्पाऊंड वॉल ही ८४0 मीटर आहे. या भिंतीवरून बाजूच्या वसाहतीतून कचरा टाकला जात आहे. याविषयी त्यांनी विभागीय क्रीडा संकुलाची भिंत ही साडेचार फूट आणखी वाढविणार असून, त्यात काटेरी कुंपण लावले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सांडपाण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. तसेच पावसाळ्यात इनडोअरहॉलमध्ये पाणी बॅडमिंटन कोर्टवर पडते. त्याविषयीचे इस्टिमेट मागविण्यात आले आहे. क्रीडा संकुलावर ओपन जीम व रोलर खरेदीसाठी डीपीडीसीमध्ये प्रस्ताव सादर करून त्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बैठकीस निमंत्रित सदस्य त्र्यंबक तुपे, उदय डोंगरे, अशासकीय सदस्य प्रा. फुलचंद सलामपुरे, दिनकर तेलंग उपायुक्त वर्षा ठाकूर, उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादवाड, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, चंद्रशेखर घुगे, तहसीलदार विजय राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अरविंद शेजूळ, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा उपस्थित होते.
सूतगिरणीच्या जागेवर स्विमिंगपूल
स्विमिंगपूल, अॅस्ट्रो टर्फ आणि सिंथेटिक ट्रॅकविषयी छेडले असता सूतगिरणीच्या चार एकर जागेवर स्विमिंगपूल व अॅस्ट्रो टर्फची योजना आहे आणि याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे विभागीय आयुक्त भापकर यांनी सांगितले.
कामगारांची २ कोटी ५४ लाख थकबाकी
यादरम्यान सूतगिरणीतील कामगारांचे ४ कोटी ५४ लाख रुपये देणे अद्यापही बाकी आहे. याआधीचे ४ कोटी ८४ लाख रुपये कामगारांना मिळाले आहेत. याविषयीचे निवेदन विठ्ठल कदम यांनी विभागीय आयुक्तांना दिले.