स्वच्छता अभियानाला ‘खो’
By Admin | Published: February 17, 2015 12:25 AM2015-02-17T00:25:41+5:302015-02-17T00:42:32+5:30
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; प
औरंगाबाद : राज्य परिवहन महामंडळातर्फे १६ फेब्रुवारीपासून १५ दिवस स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा परिवहनमंत्र्यांनी केली; परंतु एस.टी. महामंडळाच्या औरंगाबाद विभागात अभियानाला पहिल्याच दिवशी ‘खो’ देण्यात आल्याचे चित्र ‘लोकमत’ने सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकात केलेल्या पाहणीतून समोर आले. कचऱ्याने भरलेल्या, तंबाखू, पान खाऊन पिचकाऱ्या मारल्याने लाल झालेले कोपरे अशा प्रकारे अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त अनेक बसगाड्या प्रवाशांना घेऊन रवाना झाल्या.
राज्यातील सर्व बस आगार आणि बसस्थानकांची पूर्णपणे स्वच्छता होण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ राबविण्याची घोषणा करण्यात
आली.
या अभियानांतर्गत सर्व बसस्थानके, आगार यांची रंगरंगोटी करणे, प्रसाधनगृहे आणि परिसराची स्वच्छता करणे, योग्य ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे, झाडांच्या कुंड्या ठेवणे, आगारातून निघणारी प्रत्येक बसगाडी स्वच्छ झाडून व धुऊन पाठविणे अशा प्रकारच्या विविध सूचना महामंडळाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या होत्या; परंतु अभियानाच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद विभागाने त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले.
बसस्थानकात दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारे स्वच्छता करण्यात आली नव्हती.
कुठे कागदांचे ढीग पडलेले, कुठे कचरा साचलेला असे दिसले. शिवाय रवाना होणाऱ्या अनेक बसगाड्यांची स्वच्छतेची परिस्थिती अत्यंत वाईट होती. त्यामुळे एक प्रकारे परिवहनमंत्र्यांच्या सूचनेलाच अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. स्वच्छता अभियानच्या अंमलबजावणीबाबत विभाग कोसो दूर असल्याचे दिसून
आले.
कचरा पेट्या बंद खोलीत
मध्यवर्ती बसस्थानकास काही दिवसांपूर्वी एका संस्थेकडून कचरा पेट्या देण्यात आल्या होत्या. यातील काही कचरा पेट्यांचा वापर सुरू केला आहे, तर काही कचऱ्या पेट्या बंद खोलीत पडून आहेत.