रस्ते काँक्रिटीकरणाने स्वच्छतेचा बोजवारा!
By Admin | Published: May 16, 2017 12:43 AM2017-05-16T00:43:45+5:302017-05-16T00:44:41+5:30
जालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात चार महिन्यांपासून विविध भागांत रस्त्यांचे काँक्रिटीकरण येत आहे. खोदकामांमुळे घंटागाडी गल्लीबोळात पोहचत नाहीत. परिणामी त्या त्या परिसरातील कचरा संकलनावर परिणाम झाला आहे. शहरात दररोज सुमारे ८० टन कचरा निघतो. पैकी केवळ ५० टक्के कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
जालना शहरात डांबरी रस्त्यांच्या जागी सिमेंटचे रस्ते होत आहेत. यासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले. कामे सुरू होण्यापूर्वी कचरा संकलनासाठी येणारी घंटागाडी व कचराकुंड्या उचलण्यासाठी हायड्रोलिक वाहने आठ ते पंधरा दिवसांआड तरी येत असे. परंतु रस्ते खोदकामामुळे गत अडीच ते तीन महिन्यांपासून कचरा संकलनावर याचा परिणाम दिसून येत आहे. साचलेला कचरा पुन्हा नाल्यांमध्ये टाकला जात आहे.
विशेषत: कचेरी रोड, सिंधी बाजार, सराफा, गांधी चमन परिसर, शिवाजी पुतळा, मंगळबाजार वेस, टाऊन हॉल आदी भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्य रस्ते बंद असल्याने घंटागाड्या अथवा कचरा संकलन करणारी अन्य वाहने अंतर्गत भागात येत नाही. कचरा टाकावा तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भागात उकिरडे असल्याने तेथे कचरा टाकून नागरिक मोकळे होतात. काही भागात कचराकुंड्याही नाहीत आणि उकिरडेही नाहीत. त्यामुळे ती कुटुंबे त्रस्त आहत. रस्ते कामे सुरू असल्याने घंटागाडी येऊ शकत नाही, अशी जुजबी उत्तरे स्वच्छता विभागातून मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल म्हणाल्या, शहरातील स्वच्छता प्राधान्याने करण्यात येत आहे. काही भागांत रस्त्याची कामे सुरू असल्याने स्वच्छतेवर परिणाम होत आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगर पालिकेकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी शहरात स्वच्छता अभियान राबवून उर्वरित रस्त्यांची कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात येतील.