ठाणेदारांच्या खांदेपालटाचा मार्ग मोकळा; निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांची यादी जाहीर
By राम शिनगारे | Published: December 9, 2022 08:17 PM2022-12-09T20:17:56+5:302022-12-09T20:18:12+5:30
शहरात दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद :पोलिस आयुक्तालयातील ठाणेदारांच्या रखडलेल्या अंतर्गत बदल्यांना लवकरच मुहूर्त लागणार आहे. राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक आणि उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. त्यामुळे शहरात दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या अधिकाऱ्यांची खांदेपालट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या बदल्यांची प्राथमिक यादीही तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या, चारजण इतर ठिकाणांहून शहरात दाखल होणार आहेत.
राज्याच्या गृह विभागाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात छावणीचे निरीक्षक शरद इंगळे यांची जळगाव येथे, वेदांतनगरचे सचिन सानप यांची मुंबई शहर आणि शहर वाहतूक शाखेचे मनोज बहुरे यांची अकोला येथे बदली केली आहे. जळगाव येथून पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे, जालना प्रशिक्षण केंद्रातून परवीन यादव, गणेश ताठे आणि औरंगाबाद बीडीडीएस येथून सुशीलकुमार जुमडे यांची आयुक्तालयात नियुक्ती करण्यात आली. पोलिस आयुक्तांचे जनसंपर्क अधिकारी, सपोनि वामन बेले यांची नांदेड परिक्षेत्र येथे, तर औरंगाबाद ग्रामीणमधील दिनेश जाधव यांची मुंबई शहरात बदली झाली. त्याचवेळी मुंबई येथून सहायक निरीक्षक कल्पेश देशमुख, औरंगाबाद ग्रामीणमधून राजेंद्र बनसोडे आणि परभणी येथून राजकुमार पुजारी यांची आयुक्तालयात बदली केली. शहरातील पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, राजेंद्र बांगर यांची औरंगाबाद परिक्षेत्र, संदीप शिंदे सीआयडी आणि बाळासाहेब आहेर यांची नाशिक परिक्षेत्रात बदली केली आहे.
औरंगाबाद परिक्षेत्रात यांची नियुक्ती
औरंगाबाद ग्रामीण, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या परिक्षेत्रासाठी गडचिरोली येथील सहायक पोलिस निरीक्षक वैभव रणखांब, नागपूर शहरातून साजीद अहमद अब्दुल रशीद, राजेंद्र घुगे, मुंबई शहरातून हनुमंत कांबळे, प्रवीण जाधव, सतीश कोटकर, भाऊसाहेब वाघमोडे, समाधान पवार यांची बदली औरंगाबाद परिक्षेत्रात झाली आहे. त्याचवेळी नांदेड येथून उपनिरीक्षक संतोष गीते, सीआयडीतून कांचन कानडे, औरंगबाद शहरातून गजानन साेनटक्के, राजेंद्र बांगर यांची नियुक्तीही परिक्षेत्रात झाली आहे.