वेतन पडताळणी शिबिरात एक हजाराची लाच घेताना लिपिक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:03 AM2020-12-25T04:03:26+5:302020-12-25T04:03:26+5:30
याबाबत माहितीनुसार, वेतन पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने वैजापूर पंचायत समितीत २१ ते २४ डिसेंबरदरम्यान शिबिर आयोजित केले होते. ...
याबाबत माहितीनुसार, वेतन पडताळणीसाठी जिल्हा परिषदेच्या लेखा विभागाने वैजापूर पंचायत समितीत २१ ते २४ डिसेंबरदरम्यान शिबिर आयोजित केले होते. तालुक्यातील एक शिक्षक आपल्या सहाव्या आणि सातव्या वेतन आयोग व चटोपध्यायची पडताळणी करण्यासाठी आले होते. वेतन पडताळणीसाठी संबंधित शिक्षकाला कॅम्पसाठी आलेले लिपिक दाभाडे यांनी एक हजार रुपयांची मागणी केली. मात्र, शिक्षकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला फोनवरून संपर्क साधला. गुरुवारी शिबिराचा शेवटचा दिवस असल्याने पथकाने त्वरित हालचाल करून गुरुवारी सायंकाळी पंचायत समिती परिसरात सापळा लावला. ठरलेल्या वेळेवर पंचायत समितीतील लेखा विभागात बसलेल्या दाभाडे याने एक हजार रुपयांची रक्कम घेताच पथकाने त्याला रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, भीमराज जिवडे, प्रकाश घुगरे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल यांनी हा सापळा यशस्वी केला. याप्रकरणी रामू सोनाजी दाभाडे (३८, रा. औरंगाबाद) याच्यावर वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.