विद्युत निरीक्षक कार्यालयातील लिपीक लाचेच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 08:31 PM2018-10-08T20:31:10+5:302018-10-08T20:31:37+5:30
इलेक्ट्रीकल कंत्राटदार म्हणून नवीन लायसन्स देण्यासाठी अर्जदाराकडून २ हजार २०० रुपये लाच घेताना प्रादेशिक विद्युत निरीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून सोमवारी त्रिमूर्ती चौक येथील कार्यालयात रंगेहात पकडले.
औरंगाबाद: इलेक्ट्रीकल कंत्राटदार म्हणून नवीन लायसन्स देण्यासाठी अर्जदाराकडून २ हजार २०० रुपये लाच घेताना प्रादेशिक विद्युत निरीक्षक कार्यालयातील प्रमुख लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी सापळा रचून आज त्रिमूर्ती चौक येथील कार्यालयात रंगेहात पकडले.
शंकर रामराव आलेवाड(वय ५०)असे आरोपी प्रमुख लिपीकाचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार हे नाशिक येथील रहिवासी असून त्यांनी मे. साईरत्न इलेक्ट्रीकल, नाशिक या नावाने इलेक्ट्रकील कंत्राटदार म्हणून लायसन्स हवे होते. याकरीता त्यांनी त्रिमूर्ती चौकातील प्रादेशिक विद्युत निरीक्षक मंडळ उद्योग उर्जा व कामगार विभाग येथे अर्ज दाखल केला होता. हे लायसन्स मंजूर करण्यासाठी कार्यालयातील प्रमुख लिपीक शंकर आलेवाड यांनी तक्रारदाराकडे साडेतीन हजार रुपये लाच मागितली होती.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी आलेवाडविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोकरट, महादेव ढाकणे, पोलीस नाईक विजय ब्रम्हंदे, अश्वलिंग होनराव, रवींद्र अंबेकर, सुनील पाटील, अनिल राजपूत यांनी आज आरोपीच्या कार्यालयात सापळा रचला. यावेळी लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यासाठी दोन पंचासमक्ष तक्रारदार यांना आलेवाड यांच्याकडे पाठविले तेव्हा तडजोड करीत त्यांनी २ हजार २०० रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदार यांच्याकडून लाचेचे २ हजार २०० रुपये त्यांनी घेतले. त्यावेळी साध्या वेशात उपस्थित असलेल्या लाचलुचपत विभागाच्या अधिकारी कर्मचा-यांनी लाचेच्या रक्कमेसह आरोपी आलेवाड यास पकडले. त्यांच्याविरोधात जवाहरनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.