१० हजार रुपये लाच घेताना भूजल सर्वेक्षण विभागाचा लेखाधिकारी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 05:54 PM2019-09-11T17:54:22+5:302019-09-11T20:30:35+5:30
सेवानिवृत्तीचा धनादेश देण्यासाठी केली लाचेची मागणी
औरंगाबाद: स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या एका कर्मचाऱ्याकडून भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना भूजल सर्वेक्षण विभागाच्या लेखाधिकाऱ्यास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
कौतिक यादवराव काचोळे( ५६)असे आरोपी लेखाधिकाऱ्याचे नाव आहे. याविषयी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, ५७ वर्षीय तक्रारदार हे भूजल सर्वेक्षण विभागात कार्यरत होते. त्यानी स्वेेछानिवृत्तती घेतली होती. अशा कर्मचाऱ्यांना शासनाकडून विशिष्ट अशी हक्काची रक्कम मिळत असते. याविषयी त्यांनी कागदोपत्राची पूर्तता केल्याने नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडून त्यांच्यासाठी धनादेश पाठविला होता. हा धनादेश मिळावा, याकरीता त्यांनी त्यांच्या कार्यालयातील लेखाधिकारी कौतिक काचोळे यांची आज बुधवारी सकाळी भेट घेतली. तेव्हा काचोळे यांनी धनादेश देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच लाचलूचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे काचोळे यांची तक्रार केली.
यानंतर पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, कर्मचारी विजय ब्राम्हंदे, रविंद्र आंबेकर, सुनील पाटील, चांगदेव बागुल यांच्या पथकाने काचोळेला पकडण्यासाठी भूजल सर्वेक्षण कार्यालयात सापळा रचला. तक्रारदार हे दुपारी पुन्हा कार्यालयात गेले असता आरोपी काचोळे यांनी पुन्हा दहा हजार रुपयांची मागणी केली. यावेळी तक्रारदार यांनी त्यांना लाचेचे दहा हजार रुपये देताच दबा धरून बसलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लगेच लाचेच्या रक्कमेसह काचोळे यांना पकडले. आठ दिवसातील ही तिसरी कारवाई असल्याने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.