वातावरण बदलामुळे रब्बीवर वाढला रोंगाचा प्रादुर्भाव
By | Published: December 4, 2020 04:10 AM2020-12-04T04:10:35+5:302020-12-04T04:10:35+5:30
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा शिवारात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, आदी पिकांवर ...
बनकिन्होळा : सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा शिवारात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, मका, हरभरा, आदी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. खरिपापाठोपाठ आता रब्बीचाही हंगाम निसर्गाच्या लहरीपणामुळे धोक्यात आल्याने शेतकरी पुन्हा एकदा आता अडचणीत सापडला आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊ लागला आहे. अचानक थंडी वाढणे किंवा अचानक गरमी होणे, असे प्रकार सातत्याने घडत असून, सकाळी दाट धुके पडत असल्याने गहू, मका ही रब्बीची पिके कोवळी होत आहेत. त्यामुळे मका व गव्हाची वाढ खुंटली आहे. गहू, मका, हरभरा आदी पिकांना पोषक वातावरण मिळत नसल्याने त्या पिकांवर विविध रोग पडले असून, कोवळ्या पिकांवर अळीने हल्ला चढविला आहे.
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने खरीप पिकांची वाट लागली आहे. त्यापाठोपाठ निसर्गाच्या लहरीपणामुळे आता रब्बी हंगामहीसुद्धा वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी ग्रासला गेला आहे. परतीच्या पावसामुळे सध्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीच्या पेऱ्यात मोठी वाढ झालेली दिसून येते. मात्र, सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे गहू, मका, हरभरा, ज्वारी पिकांवर मोठा परिणाम होत आहे. पिकांवर महागडी औषधी फवारणी करूनही काही उपयोग होत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
पाणीसाठा मुबलक उपलब्ध
निल्लोड व बनकिन्होळा, बाभूळगाव बु. शिवारातील निल्लोड लघुसिंचन प्रकल्पासह परिसरातील नदी- नाले, ओढे, विहिरी, तसेच छोटे- मोठे बंधारे तुडुंब भरले आहेत. पाणीसाठा मुबलक आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गहू, मका, हरभरा, ज्वारी आदी पिकांची लागवड केली जात आहे. मध्यंतरी थंडी पडू लागली होती. त्यामुळे हवामान पोषक ठरणार, असे वाटत होते. मात्र, आता ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
-ज्ञानेश्वर भगत, शेतकरी, भायगाव
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित
अवकाळी पावसाने खरीप हंगामाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आता रब्बी हंगामही सततच्या बदलत्या वातावरणाने धोक्यात आला असून, पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने हंगाम वाया जातो की काय, यांची चिंता लागली आहे.
-संजय फरकाडे, शेतकरी, बनकिन्होळा
फोटो :
सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरात सततच्या होणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे पेरणी केलेले गव्हाचे पीक पिवळे पडत आहे. (छाया : केशव जाधव)