जिगरी मित्र जग सोडून गेला; विरहात तरुणाने दुसऱ्याच दिवशी संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2022 07:11 PM2022-08-03T19:11:46+5:302022-08-03T19:11:58+5:30
दोन दिवसांत दोघांनी आत्महत्या तर एकाचा अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
गंगापूर (औरंगाबाद) : जिवलग मित्राने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचे दुःख सहन न झाल्याने दुसऱ्याच दिवशी कल्पेश राजू गायकवाड (२५, रा.मांजरी ) याने देखील आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. दोन दिवसांत गावांतील हा तिसरा मृत्यू असल्याने मांजरी गांवावर शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील मांजरी येथील पंढरीनाथ रघुनाथ पारे (३६) यांने मंगळवारी नैराश्यातून आत्महत्या केली होती. पारे याचा जिवलग मित्र कल्पेश अतिशय दुःखी होता. कल्पेश पंढरीनाथच्या मृतदेहाला कवटाळून रडत होता. कल्पेश यास आपला मित्र सोडून गेल्याचे दुःख सहन झाले नाही. त्यामुळे त्याने बुधवारी सकाळी साडे दहाच्या वाजेच्यासुमारास स्वतःच्या घरी विषारी द्रव्य प्राशन केले.
दरम्यान, कल्पेशच्या भावाने त्याला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, विषारी द्रव्य कल्पेशच्या शरीरात सर्वत्र पसरले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मृत कल्पेशच्या पश्चात पत्नी- मुलगी,आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
दोन दिवसात तिघांच्या मृत्यूने मांजरी गावावर शोककळा
नागपंचमीच्या दिवशी पंढरीनाथ पारे याची आत्महत्या, तर आज महाविद्यालयीन विद्यार्थी आदित्यराज सुंब याचा अपघाती मृत्यू आणि कल्पेशची आत्महत्या, अशा दोन दिवसांमध्ये तीन दुर्दैवी घटना मांजरी गावात घडल्या. यामुळे गावावर शोककळा पसरली होती.