जिवलग मित्र क्षणात गमावले; अंधार अन् पाण्यात मृत्यूशी केला अर्धा तास संघर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:18 PM2020-01-02T15:18:49+5:302020-01-02T15:22:25+5:30
नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीला जाण्याचा बेत ठरला जीवघेणा
औरंगाबाद : नवीन वर्षाच्या पहाटे झालेल्या अपघातातील युवकांना मदत पथकाने येऊन बाहेर काढेपर्यंत त्यांचा पाण्यात अंधाऱ्या विहिरीत जीव वाचविण्यासाठी अर्धा तास संघर्ष सुरू होता. या अपघाताने तीनही युवकांच्या मनातील मृत्यूचे तांडव बुधवारी दिवसभरही हटलेले नव्हते.
सौरभ विजय नांदापूरकर (२९, रा. श्रीनिकेतन, रोकडिया हनुमान कॉलनी) यांची काल्डा कॉर्नर येथे मेडिकल फार्मा नावाची कंपनी आहे. वीरभास मुकुंद कस्तुरे (३४, रा. पुंडलिकनगर) हे मूळ लातूर जिल्ह्यातील सेलगाव येथील रहिवासी आहेत. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून औरंगाबादेत ते काम करीत होते. नुकतेच त्यांचे काम सुटले होते. ते नवीन कामाच्या शोधात होते. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागत पार्टीला जाण्याचा बेत ठरला आणि सौरभ, वीरभास तसेच नितीन रवींद्र शिरसीकर, प्रतीक गिरीश कापडिया व मधुर प्रवीण जयस्वाल हे सर्व मित्र अन्य चारचाकी वाहनातून दौलताबादच्या पुढे एका हॉटेलवर गेले होते.
पोहता येत नव्हते; परंतु गाडीला धरले
समोरील वाहनाच्या प्रकाशाने गाडी रस्त्याच्या बाजूला दाबण्याचा प्रयत्नात अचानक कशी पाण्यात पडली काहीच कळत नव्हते; परंतु आपला अपघात झाल्याचे लक्षात आल्याने कंबरेचा सीट बेल्ट सोडून दरवाजाची काच जोराने ढकलून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बारवेतील पाणी आणि काळोखात काहीही दिसत नव्हते. माझ्यापाठोपाठ मधुर आणि प्रतीक हे दोघेही बाहेर पडले. दरम्यान, विहिरीच्या बाजूला नागरिकांचा गराडा पडलेला दिसल्याने, हरवलेली हिंमत परत आली. मदतकार्य करणाऱ्यांमुळे सौरभ आणि वीरभासलाही बाहेर काढण्यात यश आले.
क्षण आठवला की वाटते भीती
निखिल शिरसीकर पुण्यात एका कारखान्यात नोकरी करतात. ते नुकतेच सुटीवर औरंगाबादला आई-वडिलांकडे आले होते. वडील एस. टी. महामंडळातून निवृत्त आहेत. या घटनेचे वृत्त जेव्हा कानावर आले तेव्हा कुटुंब भेदरलेल्या अवस्थेत होते. फोन लागत नव्हते, कुणाचाही संपर्क होत नव्हता, असे निखिलच्या घरच्यांनी सांगितले.
बोलण्याच्या मन:स्थितीतही नाहीत
प्रतीक गिरीश कापडिया यांचे कापड दुकान असून, मधुर प्रवीण जयस्वाल यांचे रंगाचे दुकान आहे. दोघेही अपघाताने घाबरलेले असून, बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. ते सध्या औषधोपचार घेऊन आराम करीत आहे, असे त्यांच्या कुटुंबातून सांगण्यात आले.
सौरभसाठी वधू शोधणे सुरू होते
सौरभ नांदापूरकर हा अत्यंत मनमिळाऊ मित्र होता. कोणत्याही कार्यात त्याचा मोठा सहभाग असायचा. त्याच्या विवाहाची चर्चा सुरू होती. वधू पाहण्यासाठी या वर्षात घरातील मंडळी जाणार होती; परंतु काळाने त्याच्यावर घाला घातला. विजय नांदापूरकर यांचे नक्षत्रवाडी येथील एका दवाखान्यात औषधी दुकान असून, सौरभने फार्मा कंपनी काल्डा कॉर्नर येथे सुरू केलेली होती. भाऊ व बहीण सर्व कुटुंबही एकत्रच श्रीनिकेतन कॉलनीत वास्तव्यास होते. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली. त्याच्या पार्थिवावर कैलासनगर स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वीरभासची पत्नीही गावाकडे
पुंडलिकनगरात भाड्याने खोली करून राहणारा वीरभास कस्तुरे याची पत्नी नुकतीच एक महिनाभरापूर्वी गावाला गेली होती, तर तो नोकरीच्या शोधात होता. दुपारी मित्राने त्याला फोन करून विचारले असता घरीच असल्याचे उत्तर देण्यात आले; परंतु सकाळी अपघातासंदर्भात ६ वाजेच्या दरम्यान फोन आला आणि एकच धांदल उडाली. त्याचे आई-वडील लातूर येथील सेलगाव येथे वास्तव्यास आहेत. औषधी विक्री प्रतिनिधी (एमआर) म्हणून तो काम करीत होता. तो चांगला मित्र होता. भाऊ व नातेवाईक रुग्णवाहिकेने मृतदेह सेलगावला घेऊन गेले.
- अभिषेक मंत्री (मित्र)