औरंगाबादेत शास्त्रीय सुरावटीने देवगिरी संगीत महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:49 PM2018-02-10T23:49:34+5:302018-02-10T23:49:43+5:30
ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर क ारेकरांच्या स्वरसाजाने दोनदिवसीय देवगिरी संगीत महोत्सवाचा समारोप झाला आणि शास्त्रीय संगीतातील स्वरमाधुर्य शनिवारी सायंकाळी शहरातील कानसेनांना तृप्त करून गेले. रंगमंचावर रंगलेल्या सुरांच्या आतषबाजीला रसिक मंडळींकडून मिळालेली ‘वाहवा...’ कार्यक्रमाची रंगत वाढविणारी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ज्येष्ठ गायक पं. प्रभाकर क ारेकरांच्या स्वरसाजाने दोनदिवसीय देवगिरी संगीत महोत्सवाचा समारोप झाला आणि शास्त्रीय संगीतातील स्वरमाधुर्य शनिवारी सायंकाळी शहरातील कानसेनांना तृप्त करून गेले. रंगमंचावर रंगलेल्या सुरांच्या आतषबाजीला रसिक मंडळींकडून मिळालेली ‘वाहवा...’ कार्यक्रमाची रंगत वाढविणारी ठरली.
देवगिरी महाविद्यालयाच्या वरिष्ठ संगीत विभागाच्या वतीने मागील वर्षीपासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत यांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. ‘भीमपलासी’ रागातील बंदिशीने पं. कारेकरांनी स्वरमैफलीची सुरुवात केली. त्यानंतर ‘भूपाली’ रागातील बंदिश सुरांचा वेगळाच आनंद देणारी ठरली.
‘मर्मबंधातली ठेव ही...’ हे नाट्यगीत अनेकांच्या आठवणींना उजाळा देणारे ठरले. ‘चंद्रकंस’ रागात गायलेला वेणुनाद, ‘भीमपलासी’मध्ये गायलेला तराणा, ‘प्रिये पहा...’ हे नाट्यगीत रसिकांची वाहवा मिळविणारे ठरले. त्यांना त्यांचे पट्टशिष्य सुनील कुलकर्णी यांनी स्वरसाथ दिली.
सकाळच्या पहिल्या सत्रात सुनील कुलकर्णी यांनी पं. नाथराव नेरळकरांची प्रकट मुलाखत घेतली. यादरम्यान बोलताना नाथराव म्हणाले की, गाणे म्हणजे स्वरांची भाषा असून, गायन कला ही चराचरांत सामावलेली आहे. गायनातल्या अनेक गोष्टी समजावून सांगत त्यांनी पं. जाकीर हुसेन, फिरोज दस्तुरकर, भीमसेन जोशी यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. यानंतर हेमा उपासनी यांचे गायन झाले. त्यांनी गायलेली ‘रात ऐसी गोठीली की, चंद्रही थरकापला...’ ही गजल प्रभावी ठरली.
याप्रसंगी आ. सतीश चव्हाण, पंडितराव हर्षे, प्राचार्य डॉ. शिवाजी थोरे, उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, डॉ. सी. एस. पाटील, प्रा. शैलजा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
महोत्सवाचा पहिला दिवस (दि. ९ फेब्रुवारी) गाजला तो आंतरराष्ट्रीय ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर यांच्या प्रकट मुलाखतीने आणि सादरीकरणाने. यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजी पंडित यांची उपस्थिती होती. पारंपरिक मुजरा, छक्कड, लावणी यांचे सादरीकरणही यावेळी झाले. यानंतर रामानंद उगले यांनी गण, गवळण, गोंधळ आदी सादर के ले. सायंकाळच्या सत्रात गायिका सावनी रवींद्र आणि प्रा. राजेश सरकटे यांचे गायन रसिकांना आनंद देणारे ठरले.
मला ओळख देणारे गीत
मी अनेकदा ठरवतो की, आजच्या मैफलीत ‘प्रिये पहा..’ हे नाट्यगीत गायचेच नाही; पण रसिकांना हे गीत ऐकल्याशिवाय मैफल पूर्ण झाल्याचा आनंद मिळतच नाही. ‘प्रिये पहा..’ हे गीत आपल्याला ओळख देणारे ठरले, या गीतापासूनच आपली कुठेतरी सुरुवात झाली, अशा शब्दांत पं. कारेकरांनी ‘प्रिये पहा..’ या नाट्यगीताच्या आठवणी सांगितल्या आणि रसिकांना या सुरांचा आनंद मिळवून दिला.