औरंगाबाद महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी काम बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:15 PM2018-09-20T22:15:30+5:302018-09-20T22:19:08+5:30
महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.
औरंगाबाद : महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बचतगट, रिक्षा कंत्राटदारांना कोट्यवधी रुपये मनपाकडून अदा करण्यात येत आहेत. महापालिकेच्या लेखा विभागाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने एक हजार कर्मचारी सोमवार २४ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे.
मागील दोन-तीन वर्षांमध्ये महापालिकेत असंख्य पदे रिक्त झाली आहेत. रिक्त पदांवर काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. मनपा अधिकारी व कर्मचाºयांच्या वाहनांवर कंत्राटी चालक, कचरा जमा करणाºया रिक्षांवर चालक, पाणी सोडण्यासाठी वॉर्डनिहाय कर्मचारी, सुरक्षारक्षक, संगणकचालक, कनिष्ठ अभियंते आदी वेगवेगळ्या कामांसाठी हे कर्मचारी नेमले आहेत. महापालिकेच्या विविध कामांचा डोलारा सध्या याच कर्मचाºयांवर अवलंबून आहे. मनपा दरमहिन्याला विविध संस्थांना पगार देते. संस्था या कर्मचाºयांना पगार करीत असते. मागील पाच महिन्यांपासून या कर्मचाºयांचा पगार मनपाने केला नाही. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदरच अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यात पाच महिने पगार नाही, म्हणजे जगायचे कसे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. मनपाने बचतगट, कचºयाच्या रिक्षाही याच कंत्राटी पद्धतीने नेमल्या आहेत. त्यांचा पगार दरमहिन्याला वेळेवर अदा करण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांना आता १९ हजार रुपये प्रत्येकी पगार देण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांची संख्या जवळपास ३५० आहे.
सोमवार २४ सप्टेंबरपासून कंत्राटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे. त्या पाठोपाठ कच-याच्या रिक्षा, अधिकारी व कर्मचाºयांची वाहने एकाच ठिकाणी उभी राहतील. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचा-यांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे. प्रशासन नियोजन करीत आहे. आंदोलनाची वेळ कोणावरही येणार नाही. यासंदर्भात योग्य तोडगा काढण्यात येईल.
पर्यटन केंद्रही बंद पडणार
रेल्वेस्टेशन येथे मनपाने मोठा गाजावाजा करून पर्यटन केंद्र सुरू केले. या केंद्रात विद्यापीठाच्या एमटीए विभागातील पाच विद्यार्थ्यांची नेमणूक केली आहे. या विद्यार्थ्यांना मागील नऊ महिन्यांपासून मनपाने मानधन अदा केलेले नाही. आता या विद्यार्थ्यांची सहनशीलता संपली आहे. या विद्यार्थ्यांनी महापौरांकडे दोन दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे नमूद केले.