औरंगाबादमध्ये प्लास्टिक विक्रेत्यांचा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:50 AM2018-03-25T00:50:55+5:302018-03-25T00:51:55+5:30
राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी शनिवारपासूनच आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्यात प्लास्टिक बंदीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. यानुसार प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संतापलेल्या विक्रेत्यांनी शनिवारपासूनच आपली दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
राज्यात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून प्लास्टिक तसेच थर्माकोलवर बंदी आणण्यात आली. शनिवारी सकाळी ही वार्ता सर्वत्र पसरली. शहरातील व्यापाऱ्यांच्या व्हॉटस्अॅपवरही शासनाच्या अधिसूचनेची प्रत व्हायरल झाली होती.
त्यामुळे संतापलेल्या विक्रेत्यांनी आपली दुकाने उघडलीच नाही. प्रत्येक दुकानावर बेमुदत बंदचे फलक लावण्यात आले होते, ते असे...‘डोकं फिरलं या सरकारचं महाराष्ट्र शासनाने संपूर्ण प्लास्टिक बंदीचा कठोर निर्णय घेतला, त्याच्या निषेधार्थ बेमुदत बंद’ असे फलकावर लिहिण्यात आले होते. मोंढ्यातील मोतीकारंजा परिसरात सर्व प्लास्टिक विक्रेते एकवटले होते. प्लास्टिक शॉप असोसिएशनचे सचिव शेख नाजीम यांनी सांगितले की, शहरात आजघडीला ५० लहान-मोठे प्लास्टिकचे होलसेलर आहेत व सुमारे ३०० फेरीवाले प्लास्टिक विकतात. दररोज १५ लाखांची उलाढाल होते. यावर आधारित १८०० परिवार बेरोजगार होणार आहेत.
तसेच मिठाई, बेकरी, गृहउद्योग, तेल उद्योग, कपडा, रेडिमेड, होजिअरी, फूड पॅकिंग आदी व्यवसायावरही मोठा फरक पडणार आहे. २००६ च्या नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग विक्रीवर बंदी आहे. त्याची आम्ही अंमलबजावणी करीत आहोत.
मात्र, संपूर्ण प्लास्टिक बंदी योग्य नाही. महिनाभरात शिल्लक प्लास्टिक परराज्यांत विक्रीचे आदेश देण्यात आले आहेत. याविरोधात आम्ही बेमुदत बंद पुकारला असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व प्लास्टिक होलसेलर हजर होते.
३०० लहान-मोठे उद्योग बंद पडण्याची भीती
औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत पॉलिमर्स उत्पादन करणारे ३०० पेक्षा अधिक युनिट आहेत. १० हजार टनपेक्षा अधिक पॉलिमर्सचे उत्पादन होते. यातही असंख्य प्रकार आहेत. यावर आधारित अनेक उद्योग आहेत. पॉलिमर्स उत्पादनावर बंदी आणल्याने सर्व उद्योग बंद पडतील. त्यामुळे हजारो लहान-मोठे उद्योगही बंद पडतील. बेरोजगारी वाढणार आहे. प्लास्टिकच्या उत्पादन व विक्रीवर राज्यात बंदी आणली आहे, पण परराज्यांत नाही. यामुळे राज्यातील सर्व उद्योग परराज्यांत स्थलांतरित होतील.
भरत राजपूत, अध्यक्ष, मराठवाडा प्लास्टिक अॅण्ड ट्रेडर्स असोसिएशन