तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांचे अपडाऊन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 11:43 PM2019-05-07T23:43:49+5:302019-05-07T23:44:32+5:30

जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

The closure of Talathi, Gramsevak, Linean, KrishiSaayak | तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांचे अपडाऊन बंद

तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांचे अपडाऊन बंद

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: दुष्काळामुळे जेथे नियुक्ती आहे त्या गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश


औरंगाबाद : जिल्ह्यात सद्य:स्थितीत भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी नाही. रोहयोची कामे, जनावरांना चारा व पाण्याची सोय करण्याच्या कामांना प्राधान्य मिळावे. यासाठी तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या आदेशामुळे वरील कर्मचाºयांचे शहर ते गाव असे अपडाऊन बंद होणार आहे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसतील, गैरहजर आढळून येतील, त्यांच्या विरोधात विभागप्रमुखांनी तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, असेही जिल्हाधिकाºयांनी आदेशात नमूद केले आहे.
७ मे रोजी काढलेल्या परिपत्रकात जिल्हाधिकाºयांनी म्हटले आहे, सद्य:स्थितीत जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, रोहयोची कामे देणे, जनावरांना चाºयाची सोय करणे आदी कामांना प्राधान्य दिले जात आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णत: प्रयत्न करीत आहे; परंतु ग्रामीण भागात जिल्ह्यामध्ये क्षेत्रीय स्तरावर अनेक ठिकाणी भेट दिली असता लोकप्रतिनिधींकडून काही तक्रारी आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक इतर कर्मचारी गावात उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी लोकप्रतिनिधींनी केल्या. ग्रामीण भागात नियुक्त असलेले सर्व कर्मचारी तेथे उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळीस्थिती पाहता तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांनी जिथे नियुक्ती आहे, त्याच गावात मुक्कामी थांबावे. जनतेच्या अडचणी, कामे सोडविण्यास प्राधान्य द्यावे. जे कर्मचारी गावात मुक्कामी नसेल, गैरहजर असल्याचे आढळून येईल, त्यांच्या विरोधात तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी. तसेच जिल्ह्यातील विभागप्रमुखांनी आपल्या अखत्यारीत ग्रामस्तरावरील कर्मचारी नियुक्ती मिळालेल्या ठिकाणी मुक्कामी आहेत की नाहीत, हे तपासावे.
कन्नडमधील तलाठ्यावर कारवाई
कन्नड तालुक्यातील तलाठी कोठावळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी दिली. टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव लवकर न दिल्यामुळे ही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्मचाºयांची धावपळ सुरू
जिल्ह्यात ४६३ सजा आहेत. त्यानुसार तलाठी, ग्रामसेवक, लाईनमन, कृषिसहायकांची नियुक्ती आहे. बहुतांश कर्मचारी व तलाठी नियुक्तीच्या ठिकाणी राहत नाहीत; परंतु जिल्हाधिकाºयांच्या आदेशामुळे दुष्काळ संपेपर्यंत त्यांना गावात राहावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी भाड्याने खोली शोधण्यास सुरुवात केली आहे. आदेशामुळे कर्मचाºयांची धावपळ सुरू झाली आहे. जिल्हाधिकाºयांचे परिपत्रक जिल्ह्यातील पूर्ण विभागप्रमुखांना पाठविण्यात आले असून, त्यानुसार अंमलबजावणी कशी होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: The closure of Talathi, Gramsevak, Linean, KrishiSaayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.