ढगांची गर्दी आहे, कृत्रिम पाऊस पाडणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 07:38 PM2019-07-01T19:38:57+5:302019-07-01T19:40:27+5:30
कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची गरज
- संतोष हिरेमठ
यावर्षी कमी-अधिक पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. यंदा राज्यात विशेषत: मराठवाड्यात पाऊस लांबला आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचीही तयारी सुरू आहे. यानिमित्त एमजीएम येथील एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक आणि हवामानतज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्याशी साधलेला संवाद...
मराठवाड्यात यंदा पाऊस लांबला. त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत?
राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होणे अपेक्षित असते, तर मराठवाड्यात १० जूनपर्यंत मान्सूनची हजेरी लागत असते; परंतु यंदा पाऊस लांबला आहे. मराठवाड्यात २७ तारखेला मान्सून सुरू झाला. पाऊस लांबण्याचे प्रमुख कारण म्हणजे उन्हाळ्यात किमान तापमानात झालेली घट आणि अलनिनोचा बसलेला फटका. पाऊस लांबणार आहे, याचे संकेत आधीच मिळाले होते.
मराठवाड्यात यंदा पावसाचे प्रमाण कसे राहील?
जूननंतर आता जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे. जून महिना तसा संपलाच आहे. पाऊस लांबल्याने या महिन्यात कमीच पाऊस झाला आहे. आता २ ते ३ जुलैदरम्यान चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. एकूण मराठवाड्यात सरासरीच्या यंदा ७० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कृत्रिम पावसाविषयी आपले काय मत आहे?
कृत्रिम पावसाची यंत्रणा कायमस्वरूपी पाहिजे, तरच त्याचा फायदा शक्य आहे. सध्या ढगाळ वातावरण आहे. आता पाऊस पाडणे शक्य होते.
जुलै, ऑगस्टमध्ये ढग नसतील तर काय करणार?
कृत्रिम पावसाची यंत्रणा कायमस्वरूपी राहिली असती तर सध्याच्या ढगाळ वातावरणाचा सदुपयोग करता आला असता. पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे, याचा अंदाज असल्याचे माहीत होते. त्यामुळे कृत्रिम पावसाची आधीच तयारी केली पाहिजे होती. जुलै, आॅगस्टमध्ये प्रयोग होणार असल्याचे समजते; परंतु ढग नसतील तर काय करणार? प्रयोग यशस्वी होईल अथवा नाही; परंतु सध्या ढगाळ वातावरण आहे आणि आता कृत्रिम पाऊस पाडणे नक्कीच शक्य होते.
पुढील आणखी दोन वर्षे पाऊस लांबणारच आहे. पावसाचे प्रमाणही कमीच राहणार आहे. किमान तापमान २२ अंशांपर्यंत घसरले आहे. पावसाळ्यात साधारण २४ ते २५ अंशांदरम्यान किमान तापमान असते. उन्हाळ्यात किमान तापमानात झालेली घट आणि अलनिनोचा फटका, यामुळे यंदा पाऊस लांबला. त्याचे संकेत पूर्वीच मिळाले होते
- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ञ